पाटबंधारेच्या कोपरगाव शाखेचा कारभार वाऱ्यावर 

Lack of staff in Kopargaon Irrigation Department
Lack of staff in Kopargaon Irrigation Department

कोपरगाव : चालू वर्षी पावसाने साथ दिल्याने ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणात मुबलक पाणीसाठा आहे. गोदावरी कालव्यांना पिण्याचे व शेतीचे आवर्तन लवकरच सोडण्यात येईल. मात्र, गोदावरी डाव्या कालव्यांतर्गत येणाऱ्या कोपरगाव शाखेत मंजूर 22 पदांपैकी 17 पदे रिक्त आहेत. मुख्य कालव्यावर 6.6 किलोमीटर कार्यक्षेत्र असलेल्या शाखेची जबाबदारी केवळ एकाच कालवानिरीक्षकावर आहे. 


अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, त्यात स्वतःला राजकीय पुढारी म्हणणारे व त्याचे पदाधिकारी यांचा हस्तक्षेप मोठा असल्याने, सात क्रमांकाचा अर्ज भरूनही शेतकरी पाण्यावाचून वंचित राहतात, हा नेहमीचाच अनुभव आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे याही वेळी असेच होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोणती चारी कुठे व कधी सोडायची, याचे नियोजन शाखाधिकारी एका निरीक्षकावर कसे करणार? यात त्यांचा कस लागणार आहे.

गुरुवारपर्यंत (ता. 12) 217 शेतकऱ्यांनी 233.90 हेक्‍टरसाठी सात क्रमांकाचे अर्ज दाखल केले आहेत. कालव्याला पाणी आल्यावर पिण्याच्या पाण्याच्या योजनेनंतर शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे. खात्यांतर्गत नियोजनाबाबत अजून कुठलीही बैठक नाही. त्याचे तीन-तेरा वाजले आहेत. आधीच कर्मचाऱ्यांची वानवा असलेल्या या शाखेचा कारभार कसा चालणार, हा प्रश्न आहे.

शाखेमध्ये एकूण मंजूर पदे 22 असून, त्यात शाखा अभियंता श्रेणी-दोनचे एक पद, दफ्तरी कारकुनाची दोन पदे (यातील एक रिक्त), स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचे एक पद असून, ते ही रिक्त आहे. मोजणीदाराची चार पदे रिक्त आहेत. कालवानिरीक्षकाची आठ पदे असून, तब्बल सात पदे रिक्त आहेत. 
एकंदरीत, शाखेचा कारभार वाऱ्यावर असून, केवळ पाच अधिकाऱ्यांवर नियोजन कसे होणार? पाणीवाटपावर याचा परिणाम होऊन शेतकरी वंचित राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे. 

रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मलादेखील येथे हजर होऊन दोनच महिने झाले आहेत. 
- सचिन ससाणे, सहायक अभियंता श्रेणी-दोन 

पद, मंजूर, रिक्त 

शाखाधिकारी -1-0, दफ्तर कारकून -2-1, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -1-1, मोजणीदार -4-4, कालवानिरीक्षक -8-7, संदेशक -1-0, कालवे चौकीदार -3-2, कालवे टपाली -1-1, शिपाई -1-1.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com