भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना आमदारांनी विचारला जाब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

- माळशिरसमधील घटना

- आर्थिक पिळवणूकीच्या तक्रारी 

- शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या

नातेपुते : माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयात नकला, नकाशे व इतर कामांसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हे भूमी अभिलेख कार्यालय आहे की दारूचा गुप्ता असा जाब त्यांनी विचारताच अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. 

आमदार सातपुते म्हणाले, भुमिअभिलेख कार्यालयामध्ये विविध कामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावरून या कार्यालयात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. पिरळे येथील लक्ष्मण कीर्दक यांनी सातपुते यांच्या समक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नकाशाच्या नकला देण्यासाठी तीन हजाराची मागणी केल्याचे सांगितले. त्यामुळे सातपुते चांगलेच भडकले. दुष्काळ व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास गप्प बसणार नाही. तुम्हाला याचा जाब द्यावा लागेल, परिणाम भोगावे लागतील अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. तुम्हाला पगार मिळत नाही का? हे कार्यालय दारूच्या धंद्या प्रमाणे चालवू नका, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. ज्यांना जबाबदारीने नीट काम करता येत नाही त्यांनी बदल्या करून घ्याव्यात असेही त्यांनी सुनावले. 

माळशिरस येथील भूमी अभिलेख कार्यालयात ज्ञानेश्वर शिंदे उपाधीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार पाहत आहेत. ते आठवड्यातून एकदाच कार्यालयात येतात असे मुख्यालय सहाय्यक ऊर्मिला पवार यांनी आमदार राम सातपुते यांना सांगितले. नंतर त्यांनी उपाधीक्षक शिंदे यांना संपर्क केल्यावर आपण आठवड्यातून दोन वेळा कार्यालयात असतो असे शिंदे यांनी त्यांना सांगितले. मुख्यालय सहाय्यक उपाधीक्षक कार्यालयात एकच दिवस हजर असतात असे सांगतात तर अधीक्षक आठवड्यातून दोन दिवस हजर असतो असे म्हणतात. अधिकाऱ्यांच्या या परस्परविरोधी विधानातून विसंगती आढळून आली. 
 

वारंवार आलेल्या तक्रारीमुळे येथे आलो
भूमी अभिलेख कार्यालयाच्या वारंवार तक्रारी आल्यानंतर आपण थेट कार्यालयात जाऊन याची माहिती घेतली. अधिकाऱ्यांना नेमकी उत्तरे देता आली नाहीत. उपाधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना बोलावले आहे. त्यांच्याकडून नेमकी माहिती घेऊन पुढील पाऊल उचलणार आहे 
राम सातपुते, आमदार माळशिरस. 

कामात सुधारणा करू
माझी माढा तालुक्‍यासाठी नेमणूक आहे. आठ महिन्यापासून माळशिरस चा अतिरिक्त पदभार आहे. शुक्रवारी याची नेमकी माहिती घेणार आहे. माळशिरसला जास्तीत जास्त वेळ देऊन कारभारात सुधारणा करू 
ज्ञानेश्वर शिंदे, प्रभारी उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय 

मोघम तक्रारी अर्थहीन
लक्ष्मण किर्दक यांनी नकला मिळवण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार केली आहे. परंतु त्यांच्याकडे नेमके कोणी पैसे मागितले हे सांगितले नाही. अशा मोघम व अर्थहीन तक्रारी बरोबर नाहीत. ज्यांनी पैसे मागितले त्यांनी त्यांच्या नावासह तक्रारी केल्या पाहिजेत. 
उर्मिला पवार, मुख्यालय सहाय्यक भूमी अभिलेख कार्यालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land Records Employees The MLAs asked