पन्हाळ्याचा मुख्य रस्ता खचला; तीन ते चार फूट खोलीच्या भेगा

पन्हाळ्याचा मुख्य रस्ता खचला; तीन ते चार फूट खोलीच्या भेगा

पन्हाळा - पन्हाळगडावर इंग्रजी राजवटीपासून कोल्हापूरहून चार दरवाजातून येणारा एक मात्र रस्ता. तो गुरुवारपेठ ते पन्हाळा पूर्णपणे खचला असून रस्त्यावर साधारण एक किलोमीटरपर्यंत तीन ते चार फुट खोलीच्या भेगा पडल्या आहेत. पाणी वाहत असल्याने भूसख्खलाने रस्ता दरीच्या बाजूने सरकू लागला आहे. काल सकाळपासूनच रस्त्याला भेगा पडायला सुरवात झाली.

सार्वजनिक बांधकाम खात्याने गतवर्षी या रस्त्याला गटार न ठेवता दरडीच्या बाजूने सिमेंटचा कठडा बांधून घेतल्याने प्रवासी कर नाक्‍यापासून ते गुरुवारपेठेपर्यंत रस्त्यावरूनच पाणी वाहत होते. हेच पाणी भेगा पडलेल्या ठिकाणी मुरत असल्याने तसेच रेडेघाट मार्तंड परिसरातून दरडीवरून येणारे पाणी माती दगडासह याच रस्त्यावर कोसळत असल्याने रात्रीच्या वेळी पडलेल्या भेगा रुंदावल्या आणि आज पूर्ण रस्ताच वाहतुकीला बंद झाला. दरम्यान प्रशासनाने बॅरिकेटस लावून रस्ता बंद केल्याने अनर्थ टळला. आज चालत जाण्यासही मनाई केली. किमान महिना दोन महिने तरी हा मार्ग सुरू होणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. 

ब्रिटीश कारकिर्दीत राज्य टिकवण्यासाठी इंग्रज सरकारला गडावर सत्ता असणे गरजेचे होते. त्यासाठी चार दरवाजा खालचा डोंगर सपाट करून तटबंदी पाडून रस्ता तयार केला. रस्त्याला उताराच्या बाजूने आधार देण्यासाठी 1888 मध्ये 40 ते 50 फूट उंचीचा आणि 400 ते 450 फूट लांबीचा दगडी कठडा बांधला, बेलदारांनी बांधलेल्या कठडयाचा मोबदला म्हणून करवीर दरबारने बेलदारांना आंबवडेच्या हददीतील कुरण बक्षीस दिले. 

कालांतराने फरशीच्या दगडाचा मुरमाचा नंतर डांबरी रस्ता तयार झाला. वयोमानानुसार हा कठडा थकला, बेदरकार वाहनांच्या टकरीत जर्जरीत झाला. वयाची साक्ष देणारी त्याच्या तोंडावरचे दगडही निसटले, या बाबत वारंवार तक्रारी झाल्या पण सार्वजनिक बांधकाम खाते ढिम्म राहिले. रस्त्याच्या वरच्या बाजूला दगडी शिळा, मार्तंड रेडेघाट परिसरात साठलेले पाणी याच दरडीतून उताराच्या बाजूने सरकायचे, साहजिकच दरवर्षी रस्त्यावरून यायचे म्हणजे जाव मुठीत घेवूनच यायचे. दरवर्षी दगड, झाडे कोसळून अगर रस्त्याला भेगा पडून तात्पुरता रस्ता बंदच होत होता.

अलीकडच्या काळात मात्र्‌ शिळा पडण्याबरोबरच भूसख्खलन होण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी भूस्खलान गुरुवारपेठेतील घरांना धोका निर्माण झाल्याने तसेच रस्ता आरल्याने या लोकांची व्यवस्था मराठी शाळेत तसेच रेडेमहालात केली होती. रस्त्यासह परिसरातीच हॉटेल, विश्रांतीगृहाना भेगा पडून या इमारती उताराच्या बाजूला सरकण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

पर्यायी रस्ते हाच पर्याय 
पन्हाळगडावर येणाऱ्या या एकमेव रस्त्याची दरवर्षीची स्थिती पाहता पावसाळयात रस्ता धोकादायक बनतोय हे अधोरेखित झाले. मुरुन येणारे पाणी सहजासहजी वळवता येणार नाही, त्यामुळे रस्त्याला पर्यायी रस्ता काढणे हाच एकमेव पर्याय आहे. 

पन्हाळ्यावर येण्यासाठी बुधवारपेठेपर्यंत अगर मंगळवारपेठेपर्यंत कोणत्याही वाहनाने येणे आणि तेथून झाडे चौकीतून प्रवासीकर नाक्‍यावर चालत येणे अगर दुचाकीने वाघबीळ, राक्षी, निकमवाडी, रविवारपेठ येथून तीन दरवाजातून पन्हाळगडी येणे एवढाच मार्ग आहे. 

तीन दरवाजातून...

एखादा रुग्ण कोल्हापूरला उपचारासाठी न्यावयाचा झाल्यास तीन दरवाजातून रिक्षाने आणि तेथून पुढे वाहनाने न्यावा लागणार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com