अतिवृष्टीमुळे पन्हाळागडाभोवती पाणी मुरून भूस्खलन

आनंद जगताप
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पन्हाळा - परिसरात अतिवृष्टीने गडाभोवती पाणी मुरून भूस्खलन होत आहे. गडाखालच्या निकमवाडी, मंगळवारपेठ, आपटी, नावली, म्हाळुंगे, जेऊर, बादेवाडी, वेखंडवाडीला धोका निर्माण झाला आहे. 

पन्हाळा - परिसरात अतिवृष्टीने गडाभोवती पाणी मुरून भूस्खलन होत आहे. गडाखालच्या निकमवाडी, मंगळवारपेठ, आपटी, नावली, म्हाळुंगे, जेऊर, बादेवाडी, वेखंडवाडीला धोका निर्माण झाला आहे. 

नावली पैकी जांभळेवाडी, मराठवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने अगोदरच केले आहे; तरीही शेती, जनावरे सोडून हे लोक नवीन ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. पन्हाळा, पावनगडमधील मार्तंड परिसरात साठणाऱ्या पाण्यामुळे पन्हाळ्याला बुधवारपेठेतून येणारा एकमेव डांबरी रस्ताही खचू लागल्याने गडावर येण्याचा एकमेव मार्ग बंद होण्याची शक्‍यता आहे. 

पन्हाळगड काळ्या कातळावर आणि काही ठिकाणी जांभी दगडावर वसल्याने पावसाळ्यात फारसे पाणी मुरत नाही. हे पाणी गडाखालील तटबंदीत असलेल्या जुन्या मोऱ्यांतून वाहते. गडाखालचा, तसेच मार्तंड परिसरातील भूभाग हा तांबड्या, पांढऱ्या, पिवळ्या शाडूमिश्रित मातीचा असल्याने या मातीत ठराविक प्रमाणात पाणी मुरते. पाणी जादा झाले, की भूभागावरचा डोंगर झाडाझुडपांसह सरकू लागतो. मसाई पठार परिसरातही हीच स्थिती आहे. बुधवारपेठ ते पन्हाळा या भागात एका बाजूला उंच दरड, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. पावसाळ्यात रेडेघाट, मार्तंड, विठोबा माळ परिसरातील पाणी मुरून मुख्य रस्त्याखालच्या गुरुवारपेठ, बुधवारपेठ, मंगळवारपेठ परिसरात उमाळे फुटून पाझरते. अनेकवेळा पाण्याचे प्रवाह आपल्याबरोबर तळातील मातीसह जोराने वाहून भूस्खलन होते. या रस्त्यावर दरवर्षी भेगा पडतात.

तहसीलदार सार्वजनिक विभागाला कळवतात. सार्वजनिक विभाग कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी भेगाळलेल्या रस्त्यावर दगड ठेवून पांढरे पट्टे ओढून रस्ता धोकादायक असल्याचा फलक लावतात. उन्हाळ्यात भेगा पडलेल्या ठिकाणी डांबर ओतून रस्ता एकजीव असल्याचा भास निर्माण करतात. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा भेगा पडतात. 

मुख्य रस्त्यावर संरक्षक कठड्याच्या खाली भेगा पडून रस्ता खचत आहे. गुरुवारपेठेत हॉटेल ग्रीनपार्कसमोर मध्यावरूनच रस्त्याला भेगा पडल्या आहेत. सकाळी भेगा किरकोळ स्वरूपात होत्या, परंतु गटारीतील वाहते पाणी भेगांत जाऊन सायंकाळी भेगा रुंदावल्या होत्या. पन्हाळा प्रवासी कर नाका ते बुधवारपेठ हा रस्ता; तसेच संरक्षक कठडा चारचाकी वाहनांसाठी धोकादायक असून, पाण्याने वरच्या भागातील दगड कधी घरंगळत खाली येतील; तसेच रस्ता कधी खचून जाईल याचा भरवसा नसल्याने प्रशासन रात्री हा रस्ता बंद करण्याच्या तयारीत आहे. 

दरम्यान, शनिवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तबक उद्यानाशेजारील महेश जगदाळे यांचा आईस्क्रिमचा गाडा झाड पडून उद्‌ध्वस्त झाला, तर सज्जाकोठीनजीकची पूर्व बाजूची तटबंदी अतिपावसाने कोसळली. 

दरम्यान खचलेल्या रस्ता परिसरात सायंकाळी माजी मंत्री विनय कोरे, उपविभागीय अधिकारी बी. बी. माली, तहसिलदार रमेश शेंडगे यांनी भेट दिली आणि हा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाघबीळकडून येणारी मोठी वाहने बंद करण्यात आली असून गडावर आलेली वा हने तेवढी कोल्हापूर कडे सोडली जात आहेत 

बुधवारपेठेतून चालत येण्याची वेळ 
गडावर येणारा मुख्य रस्ता दरवर्षी धोकादायक बनत असल्याने या रस्त्याला पर्यायी रस्ता व्हावा, म्हणून माजी नगराध्यक्ष (कै.) बाळासाहेब भोसले यांनी फुटक्‍या नंदीजवळून रस्ता तयार करावाm यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतु, लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता पन्हाळवासीयांना बुधवारपेठेतून चालत येण्याची वेळ आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landslide on Panhala Road due to heavy rains