बेळगाव शहरातील चोविस तास पाणी योजनेच्या कामाचा ठेका मिळालाय 'या' कंपनीला...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

शहरात नव्या जलवाहीनी घातल्या जाणार आहेत. दोन्ही जलाशयांमधील पाणीउपसा यंत्रणेची कार्यक्षमता वाढविली जाणार आहे. या योजनेचा भाग असलेल्या बसवनकोळ येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची निर्मिती आधीच झाली आहे.

बेळगाव - बेळगाव शहरातील चोविस तास पाणी योजनेच्या कामाचा ठेका लारसन ऍन्ड टुब्रो कंपनीला मिळाला आहे. बेळगाव शहरातील दहा प्रभागांमध्ये सध्या चोविस तास पाणी योजना आहे. या योजनेचा विस्तार उर्वरीत 48 प्रभागांमध्ये केला जाणार आहे. या कामाचा ठेका देण्यासाठी कर्नाटक पायाभूत सुविधा विकास मंडळाने आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात जगभरातील अनेक नामांकीत कंपन्यानी सहभाग घेतला होता. त्यात लारसन ऍन्ड टुब्रो कंपनीचाही सहभाग होता.

कंपनीला बेळगावसह हुबळी-धारवाड व गुलबर्गा येथील चोविस तास पाणी योजनेचाही ठेका मिळाला आहे. त्यामुळे आता या बहुचर्चित योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. आधीच्या नियोजनानुसार 2018 साली बेळगाव शहरातील प्रत्येक कुटुंबाला चोविस तास पाणी देण्यात येणार होते. त्यासाठी 2014 साली निविदा काढण्यात आली होती. मलेशिया येथील रॅनहिल कंपनीला या कामाचा ठेका मिळाला होता. पण तांत्रीक कारणासाठी तो ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाला. त्यासाठी या योजनेचा नवा आराखडा तयार करण्यात आला. विश्‍व बॅंकेकडून या योजनेसाठी आर्थित मदत दिली जाणार आहे. त्यामुळे बॅंकेच्या प्रतिनिधीनी दोनवेळा बेळगावला भेट देवून येथील जलस्त्रोत व शहराच्या भौगोलिक रचनेची माहिती घेतली. त्यानंतर 2019 साली निविदा काढण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात निविदांची तांत्रीक पडताळणी करण्यात आली होती. लवकरच ठेकेदार निश्‍चित होईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारही निश्‍चित झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यात 200 मशिनद्वारे थर्मल स्कॅनिंग ; मोठया प्रमाणात आरोग्य तपासणी 

लारसन ऍन्ड टुब्रो कंपनीला चोविस तास पाणी योजना राबवून त्याची देखभालही करावी लागणार आहे. ही योजना कार्यान्वीत झाली की बेळगाव शहरातील प्रत्येक नळाला मीटर बसविले जाईल व मीटरनुसारच पाणीपट्टी आकारली जाईल. सध्या शहरातील दहा प्रभागांमध्येच नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मीटरनुसार पाणीपट्टी आकारली जाते. या योजनेतून शहरात नवे जलकुंभ उभारले जाणार आहेत.

शहरात नव्या जलवाहीनी घातल्या जाणार आहेत. दोन्ही जलाशयांमधील पाणीउपसा यंत्रणेची कार्यक्षमता वाढविली जाणार आहे. या योजनेचा भाग असलेल्या बसवनकोळ येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची निर्मिती आधीच झाली आहे. काही ठिकाणी जलकुंभही उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरात नव्या जलवाहीनी घालण्याचे काम करावे लागणार आहे. हिडकल पाणी योजनेची कार्यक्षमता वाढविण्याची योजनाही सुरू आहे. त्याचा फायदा चोविस तास पाणी योजनेला होणार आहे. देखभालीची मुदत संपल्यानंतर कंपनीकडून या चोविस तास पाणी योजनेचे हस्तांतरण महापालिका किंवा पाणीपुरवठा मंडळाकडे केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Larson & Toubro Company has got the contract for the twenty-four hour water project in Belgaum