इचलकरंजीत पोषण आहारात अळ्या

इचलकरंजीत पोषण आहारात अळ्या

इचलकरंजी - येथील इंदिरानगरमधील अंगणवाडीतील मुलांना वाटलेल्या पोषण आहारामध्ये अळ्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. संतप्त पालकांनी अंगणवाडीत धाव घेत याबाबतचा जाब विचारला. अनेक मुलांनी खिचडी खाल्ल्यामुळे पालक धास्तावले होते.

शहरात शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने विविध ठिकाणी अंगणवाड्या सुरू आहेत. इंदिरानगर येथे ८६ क्रमांकाची अंगणवाडी आहे. तेथे सुमारे ७० मुले येतात. त्यांना बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहारांतर्गत खिचडीचे वाटप केले जाते. सुरवातीला सेविकांनी तपासणी केल्यानंतर मुलांना खिचडीचे वाटप केले जाते.

दुपारी मक्तेदारांने खिचडी पोहोच केली. नेहमीप्रमाणे त्याची वरवर पाहणी करून मुलांना वाटप केले. अनेक मुलांनी डब्यातून खिचडी घरी नेली तर काहींनी तेथेच खिचडी खाल्ली. मात्र, खिचडीमध्ये अळ्या असल्याचे काही पालकांना दिसले. अन्नाबरोबर या अळ्या शिजल्या होत्या. विशेष म्हणजे अळ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते. या प्रकारांने पालकांत खळबळ उडाली.

पालकांनी थेट अंगणवाडीत धाव घेत सेविकेसह खिचडी देणाऱ्या मक्तेदारालाही जाब विचारला. या प्रकाराबद्दल वरिष्ठ पातळीवर माहिती देण्यात आली. नगरसेवक मंगेश कांबुरे यांच्यासह कांही संघटनांचे प्रतिनिधी तेथे आले. त्यांनीही या प्रकाराची माहिती घेतली. तेथे पालकांची संख्या वाढत गेल्यामुळे तणाव निर्माण होऊ लागला. याची माहिती मिळताच गावभाग पोलिस तेथे पोहोचले.

दक्षता म्हणून मुलांवर उपचार
अनेक मुलांनी खिचडी खाल्ल्यामुळे पालकांच्या मनात भीती निर्माण झाली. विषबाधा होऊ नये, यासाठी  खबरदारी म्हणून अनेक पालकांनी मुलांना घेऊन थेट दवाखाना गाठला. तेथे मुलांच्यावर आवश्‍यक ते औषधोपचार घेण्यात आले.

बचत गटाचा मक्ता रद्द 
अंगणवाडीला शालेय पोषण आहार देण्याचा मक्ता एका बचत गटाला देण्यात आला होता. मात्र आजच्या प्रकारानंतर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित बचत गटाचा मक्ता रद्द केला.

अन्नाचे नमुने तपासणीसाठी
अळ्या आढळलेल्या खिचडीचे नमुने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com