‘लेसर शो’च्या लोकार्पणाचे काय झाले? - गौतम पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

सांगली - नेत्यांची स्मारके करतानाही तरी पारदर्शकता ठेवा. तारतम्य बाळगा. जागेवरच कारंजेच नाहीत तर लोकार्पण कसले करता? असा सवाल स्वाभिमानी आघाडीचे नेते गौतम पवार यांनी आज केला. गेल्या वर्षभरात स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या भ्रष्ट कारभाराला झटका म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला नव्हे तर संगीता हारगे यांना मदत केली. हा निर्णय काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला आहे, जयंत पाटील यांना पाठिंबा म्हणून नव्हे, असा खुलासाही त्यांनी या वेळी केला. 

सांगली - नेत्यांची स्मारके करतानाही तरी पारदर्शकता ठेवा. तारतम्य बाळगा. जागेवरच कारंजेच नाहीत तर लोकार्पण कसले करता? असा सवाल स्वाभिमानी आघाडीचे नेते गौतम पवार यांनी आज केला. गेल्या वर्षभरात स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या भ्रष्ट कारभाराला झटका म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला नव्हे तर संगीता हारगे यांना मदत केली. हा निर्णय काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला आहे, जयंत पाटील यांना पाठिंबा म्हणून नव्हे, असा खुलासाही त्यांनी या वेळी केला. 

ते म्हणाले, ‘‘नेते मदन पाटील यांचे लोकोपयोगी स्मारक करा म्हणून आम्ही त्यांच्या नावाने होणाऱ्या उद्यानाला पाठिंबा दिला. तिथे बसवल्या जाणाऱ्या पुतळ्यालाही आमचा पाठिंबा आहे. मात्र ही सर्व कामे देताना पारदर्शकता बाळगलेली नाही. निदान नेत्यांची स्मारके करताना तरी त्यांनी थोडी बाळगायला हवी होती. या स्मारकासाठी ८५ लाखांचा निधी देतानाही तो कशासाठी आजवरचा खर्च कसा झाला, याचा खुलासा प्रशासन करीत नाही. १६ लाख रुपये केवळ पुतळ्यासाठी खर्च केले आहेत. दीड कोटींचे स्मारकाचे अंदाजपत्रक आहे. त्यालाही दरवाढ दिली जात आहे. आम्ही या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आम्ही कालच वसंतदादा स्मारकाजवळील लेसर शोला भेट दिली. आज तिथे पाइपांच्या जाळे आणि रिकाम्या शेडपलीकडे काहीही नाही. लोकार्पण केले म्हणून जाहिराती करता, मग मदनभाऊंच्या जयंतीला केलेला शो केवळ शोच होता का? तिथे कोणतीही मशिन्स नाहीत. तात्पुरती भाड्याने यंत्रणा उभी करून उद्‌घाटनाचा शो करण्यात आला. या सर्व कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पन्नास टक्के निधी दिला होता. त्यासाठी स्पर्धात्मक निविदा मागवल्या का? झालेला खर्च एवढा योग्य आहे का? असे प्रश्‍न उपस्थित होतात. त्याची उत्तरे महापौर-आयुक्तांनी दिली पाहिजेत.’’

आरोप त्यांनाच लखलाभ - संतोष पाटील
स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील म्हणाले, ‘‘लेसर शोच्या उद्‌घाटनादरम्यान काही त्रुटी आढळल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी काही दुरुस्त्या ठेकेदाराला सुचवल्या आहेत. त्या दूर केल्यानंतरच ठेकेदाराची उर्वरित बिले दिली जाणार आहेत. त्यामुळेच तूर्त हा शो बंद आहे. मुळात हे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी हा निधी देऊ केला होता. मी माझ्या वर्षभराच्या काळात हे काम मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी किमान डझनभर बैठका जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झाल्या. पहिला ठेकेदार सोडून गेल्याने दुसरा ठेकेदार आणला. असे काम करणारे ठेकेदार कमी असल्याने विनानिविदा प्रक्रिया झाली. 

उरला प्रश्‍न मदनभाऊंच्या स्मारकाचा. समाधिस्थळाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याची बिलेही अद्याप प्रलंबित आहेत. स्मारकाच्या कामाची निविदाच अद्याप निघालेली नाही. जे काम झाले आहे ते बगीचाच्या कुंपणाचे. या कामाची निविदाच स्वतंत्र होती. विशेष महासभेत फक्त निधीची तरतूद केली आहे. भविष्यात रीतसर निविदा मागवून काम दिले जाईल. केवळ विरोधासाठी विरोध आणि आपल्या भूमिकेला मुलामा देण्यासाठी श्री. पवार बेताल आरोप करीत आहेत. त्यांचे आरोप त्यांना लखलाभ.’’

Web Title: laser show inauguration