#Sangaliflood लातूरकरांनी निभावला मैत्री धर्म

बलराज पवार
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भीषण भूकंप आणि दुष्काळात पाठच्या भावासारखे मदतीला धावून आलेल्या सांगलीकरांसाठी आता लातूरकर धावून आले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मदत कार्य होत आहे.

सांगली - भीषण भूकंप आणि दुष्काळात पाठच्या भावासारखे मदतीला धावून आलेल्या सांगलीकरांसाठी आता लातूरकर धावून आले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मदत कार्य होत आहे.

लातूरला सन 1993 मध्ये भीषण भूकंपाचा धक्का बसला होता. तसेच दोन वर्षांपूर्वी लातूरला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता. या या दोन्ही अस्मानी संकटात सांगलीकरांनी लातूरला मदतीचा हात दिला होता पंचवीस वर्षापूर्वी आलेल्या भीषण भुकंपावेळी सांगलीत मदतफेरी काढून निधी गोळा करण्यात आला होता तसेच मोठ्या संख्येने सांगलीतील संस्थांचे कार्यकर्ते लातूरच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेले होते. लातूरकरांचे उद्ध्वस्त झालेले संसार उभे करण्यासाठी सांगलीकरांनी मोठी मदत केली होती.

दोन वर्षांपूर्वी लातूरला भीषण दुष्काळाने ग्रासले. पाण्यासाठी लातूरकरांची वणवण सुरू होती. दुष्काळात लातूरकरांच्या मदतीला पुन्हा सांगलीकर धावून गेले. लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी त्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबवण्यासाठी सरकारने थेट रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मिरजेतून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात येत होता. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या नियोजनातून लातूरकरांना थेट रेल्वेच्या वॅगन मधून दररोज 25 लाख लिटर पाणी सुमारे महिनाभर पुरवठा करून पुन्हा एकदा सांगलीकरांनी आपला मानवताधर्म निभवला होता.

दोन वेळच्या भीषण संकटातून सावरण्यासाठी सहकार्य केलेल्या सांगलीला यांचा महापुराचा फटका बसला आहे सांगली जिल्ह्यातील सांगली महापालिकेसह 107 गावांमधील सुमारे 75 हजार कुटुंबांना महापुराने फटका दिला आहे. साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांना महापुराने उध्वस्त केले आहे.

सांगली वर कोसळलेल्या या भीषण नैसर्गिक आपत्तीत आता लातूरकर सांगलीकरांच्या मदतीला धावून आले आहेत. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूरमध्ये नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत लातूरमध्ये मदतफेरी काढण्यात येऊन मदत निधी गोळा करण्यात आला आहे.

लातूरमधील उदगीर शहरात मदतफेरी काढण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय काही व्यक्ती, संस्थाही मोठ्या प्रमाणात मदत घेऊन सांगलीत येत आहेत.

लातूर सह बीड सोलापूर हिंगोली अमरावती या जिल्ह्यांमधून हे सांगलीत मोठ्या प्रमाणात मदत आलेली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये उध्वस्त झालेले संसार, कुटुंब सावरण्यासाठी सहकार्य करून मानवतेचा नवा आदर्श उभा घरात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laturkar help flood victims