ढोबळेंचे शिलेदार काँग्रेसच्या 'गळा'ला 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 23 जानेवारी 2019

अरे बाबा... हे काय... 
प्रवेशानंतर सर्व प्राध्यापक सभागृहातच बसले होते. त्याचवेळी शहर उत्तरमधील कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरवात केला. त्यावेळी झालेला गोंधळ पाहून, काही प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर "अरे बाबा...हे काय' असे अविर्भाव होते.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या संस्थेतील चार प्राध्यापकांनी काल (ता. 22) कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच भाजपच्या इच्छुक उमेदवाराला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "चितपट' करत "डाव' साधल्याची चर्चा रंगली आहे. 

श्री ढोबळे यांच्या वसुंधरा महाविद्यालयातील चार प्राध्यापकांनी कॉंग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. त्यामध्ये प्रा. डॉ. मारोती घंटेवाड, डॉ. बापू राऊत, डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. किशोर जोगदंड यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय डॉ. दिगंबर झोंबाडे (वालचंद महाविद्यालय), डॉ. महादेव कांबळे (शिवदारे महाविद्यालय), डॉ. सचिन राजगुरू व डॉ. दीपक नारायणकर (सोशल महाविद्यालय), डॉ. दीपक देडे, प्रा. वैभव गायकवाड, मल्लिकार्जुन कसबे, प्रा. प्रशांत लभाने, प्रा. राजेश साळे, प्रा. मारुती हजारे, प्रा. रणजित हेगडे (संतोष भीमराव पाटील महाविद्यालय) या प्राध्यापकांचा समावेश आहे. तसेच सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण यांनीही कॉंग्रेस प्रवेश केला. हे प्राध्यापक सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत, त्यामुळे बुद्धिजीवी वर्ग कॉंग्रेसमध्ये आल्याचे समाधान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

श्री शिंदे यांनी सोलापूर विद्यापीठाची स्थापना केल्यामुळेच आम्हाला पीएचडी मिळवण्याची संधी मिळाली. अन्यथा आम्हाला ही पदवी मिळालीच नसती, त्यामुळे तेच खरे सोलापूरचे भाग्यविधाते आहेत, अशी भाषणे प्राध्यापकांनी केली. त्यामुळे योगायोगाने सोलापूर मतदारसंघात भाजपकडून श्री. ढोबळे यांना उमेदवारी मिळाली तर, वसुंधरा महाविद्यालयातील प्राध्यापक त्यांच्या विरोधात प्रचार करणार का? हा  प्रश्‍न आहे. एकूणच ढोबळेंच्या शिलेदारांना कॉंग्रेसमध्ये घेऊन त्यांना लोकसभा निवडणुकीत एखाद्या विभागाचे सेनापतीपद देण्याची श्री. शिंदे यांची खेळी यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

अरे बाबा... हे काय... 
प्रवेशानंतर सर्व प्राध्यापक सभागृहातच बसले होते. त्याचवेळी शहर उत्तरमधील कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरवात केला. त्यावेळी झालेला गोंधळ पाहून, काही प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर "अरे बाबा...हे काय' असे अविर्भाव होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laxman dhoble supporters joined Congress in Solapur