लक्ष्मणराव पाटील... करारी बाण्याचा नेता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, शेती, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभरात परिचित असलेले वाई तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा अल्प परिचय...

राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, शेती, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभरात परिचित असलेले वाई तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा अल्प परिचय...

आबासाहेब ऊर्फ किसन वीर यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मणराव पाटील यांचे वडील बंधू रामराव पाटील. तत्कालीन राजकारणात एक अग्रणी कार्यकर्ता म्हणून तालुक्‍यात प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर लक्ष्मणराव (तात्या) राजकारणात आले. १९६० मध्ये बोपेगावचे सरपंचपद तात्यांनी भूषविले ते अगदी १९७२ पर्यंत. त्यानंतर तात्यांच्या राजकीय वाटचालीची घोडदौड सुरू झाली. १९६७ ते १९९७ या कालावधीत वाई पंचायत समितीचे सदस्य व आठ वर्षे सभापती म्हणून काम करताना त्यांनी वाई तालुक्‍याच्या विकासाला गती दिली. १९८० ते १९९० या कालावधीत सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेस उल्लेखनीय कार्याबद्दल सुवर्णपदक आणि अनेक पारितोषिके प्राप्त झाली. विशेष म्हणजे ग्रामीण विकास कार्यक्रमाचे राज्य शासनाचे तीन लाखांचे पारितोषिक त्यांना मिळाले. तात्यांनी १९९० मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली होती. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे ते २६ वर्षे संचालक होते. या काळात चेअरमनपदाची धुरा सांभाळताना त्यांनी कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजारांवरून वाढवून ती चार हजार मेट्रिक टन क्षमतेपर्यंत पोचविली. कार्यक्षेत्रातील उसाचे उत्पादन वाढावे म्हणून शेतकऱ्यांना नवनवीन जाती उपलब्ध करून दिल्या.

कार्यक्षेत्रात विविध उपसा योजना राबवून उसाचे कार्यक्षेत्र वाढविले. १९९९ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्या वेळी सातारा जिल्ह्यातील या पक्षाचे पहिले पाईक होण्याचा मान त्यांनी मिळविला. जिल्हाध्यक्ष या नात्याने गावपातळीवर जाऊन त्यांनी पक्ष संघटनेची बांधणी केल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. या वेळी ते सातारा लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००४ मध्ये पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आणि ते दुसऱ्यांदा खासदार झाले. वाई शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी लक्ष्मणराव पाटील यांनी पुढाकार घेतला आणि विकासाचा पाया घातला. सहकार क्षेत्रात दबदबा असलेल्या तात्यांनी सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना शेतकरी विकासाच्या विविध योजना राबविल्या. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावण्याचा प्रयत्न केला.

सुशिक्षित बेरोजगारांबरोबरच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी तात्या प्रयत्नशील असत. जिल्हा बॅंकेचे संचालक, जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, कमंडलू शिक्षण संस्था आसरे व अन्य विविध संस्थाच्या माध्यमातून कार्यरत राहिलेल्या तात्यांच्या भोवती नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असे. ते स्पष्ट वक्‍ते आणि कार्यकर्त्यांचा आधारवड होते.

निष्ठा शिकावी तात्यांकडूनच...
तात्यांनी खासदारकीपर्यंत मजल मारली ती केवळ निष्ठेने, हे त्यांना जवळून पाहणारे, अनुभवणारे नक्की सांगू शकतील. त्यांनी निष्ठा कामाशी बाळगली, पदाशी बाळगली, समान्यांप्रती बाळगली तशीच पक्ष आणि नेत्यांप्रतीही बाळगली. त्यामुळेच किसन वीर यांच्यापासून ते शरद पवार यांच्याप्रती त्यांनी प्रचंड निष्ठा बाळगली. माजी खासदार प्रतापराव भोसले यांच्या प्रचाराची धुराही ते निष्ठेने सांभाळत. ‘राष्ट्रवादी’ची स्थापना होताच त्यामध्ये बेलाशक उडी घेणारे तात्या अखेरपर्यंत पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहिले.

Web Title: Laxmanrao Patil Introduction