निर्मळ, निष्पाप, करारी नेत्‍याला हरपलो...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मान्‍यवरांची अादरांजली
निर्मळ, निष्पाप स्वभाव

डॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे प्रत्येकी दहा वर्षे मिळाली, हा योगायोग म्हणावा लागेल. किसन वीर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यात वितुष्ट आले. त्याचे मला आजही दुःख होते. 

मान्‍यवरांची अादरांजली
निर्मळ, निष्पाप स्वभाव

डॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे प्रत्येकी दहा वर्षे मिळाली, हा योगायोग म्हणावा लागेल. किसन वीर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने आमच्यात वितुष्ट आले. त्याचे मला आजही दुःख होते. 

मनभिन्नता कधीच झाली नाही
विलासराव पाटील-उंडाळकर (माजी मंत्री) -
 लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. (कै.) आबासाहेब वीर यांच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे लक्ष्मणतात्या व मी राजकीय, सामाजिक काम केले. वाई पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तसेच अनेक संस्थांत तात्यांनी काम केले. लोकसभेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. देशात व राज्यात सामाजिक, राजकीय बदल झाले. त्यात जिल्ह्यातही बदल झाले. दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. मतभिन्नता आली, तरी मनभिन्न झाली नाहीत. 

विश्‍वास संपादन करणारा नेता
श्रीनिवास पाटील (माजी राज्यपाल) -
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ज्या शेलारमामांनी साताऱ्याचा अजिंक्‍यतारा लढवला आणि आजअखेर महाराष्ट्रात सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी आणि शरद पवार हे जे समीकरण प्रस्थापित झाले त्यामागे खंबीरपणे उभे राहिले ते तात्या. आज ते आपल्यात नाहीत, याचे मनस्वी दुःख होते. सातारा जिल्ह्यातील सर्वांचा विश्‍वास त्यांनी संपादन केला.  

परिवर्तनाची दिशा देणारे नेतृत्व
डॉ. इंद्रजित मोहिते (उपाध्यक्ष, भारती विद्यापीठ, पुणे) -
 सहकार आणि समाजसेवेतील ऋषितुल्य, पितृतुल्य व अजातशत्रू नेतृत्वास आज समाज हरपला. त्यांचे मार्गदर्शन तरुण पिढीला उपयुक्त होते. त्यांचे कार्य राज्य, केंद्र पातळीवर समाजसेवा व परिवर्तनाची दिशा देणारे होते. 

आमचा परस्परांना आधार होता 
सुरेश वीर (माजी अध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक) -
 लक्ष्मणराव पाटील यांचा आणि माझा गेल्या पाच - दशकांचा संबंध. माझे वडील आबासाहेबांनी माझ्यासारखे व माझ्याइतकचे लक्ष्मणराव पाटील यांच्यावर प्रेम केले. राजकारणातील चढ- उतारात यश- अपशयात बरोबर राहिलो. आमचा परस्परांना आधार होता.

कार्यकर्त्यांना वेगळी उर्मी देणारा नेता
बाळासाहेब भिलारे (ज्येष्ठ नेते) -
 जिल्हा राष्ट्रवादीचे पहिले जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करताना तात्यांनी राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाबळेश्वर तालुका दुर्गम असूनही तात्यांनी विकासकामांची कमतरता कधीही भासू दिली नाही. हे वेगळेपण त्याच्या नेतृत्वात होते. कार्यकर्त्यांना वेगळी उर्मी देणारा नेता हरपल्याने जिल्हा एका अभ्यासू नेतृत्वाला मुकला आहे.

आश्वासक, मार्गदर्शक नेतृत्व
शशिकांत पिसाळ (अध्यक्ष, वाई तालुका सहकारी सूतगिरणी) -
 मदनराव पिसाळ यांच्या निधनानंतर लक्ष्मणराव पाटील यांनी आम्हा कुटुंबाला राजकीय जीवनात मोठा आधार दिला. तालुक्‍याच्या राजकारणात आप्पा आणि तात्या यांच्यात मतभेद झाले असतील; परंतु पिसाळ व पाटील यांच्यातील मैत्रीचे नाते कायम होते. पत्नी अरुणादेवी पिसाळ यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवून देण्यात तात्यांनी सिहांचा वाटा उचलला होता.

एक वादळ हरपले
राजेंद्र शेलार (प्रदेश प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती) -
 लक्ष्मणराव पाटील तथा तात्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला. जिल्ह्याच्या राजकारणातील व क्षमता आणि अधिकारांचा जनतेसाठी पुरेपूर वापर करणारा लोकनेता, एक वादळ हरपले.

जिल्ह्यातील धुरंधर राजकारणी 
नितीन भरगुडे-पाटील (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद) -
 लक्ष्मणराव पाटील हे जिल्ह्यातील धुरंधर राजकारणी होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपले नाव नेहमी चढत्या आलेखात कायम ठेवले. 

एका पित्यासमान मायेची सावली 
दत्तानाना ढमाळ (अध्यक्ष, खंडाळा राष्ट्रवादी काँग्रेस) -
 बापमाणूस, राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतिक्षय उत्तुंग भरारी घेतलेल्या लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनाने ‘राष्ट्रवादी’ची हानी झाली आहे. 

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड 
बाळासाहेब सोळस्कर (उपाध्यक्ष, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस) -
 सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे तात्या हे एक आधारवड होते. त्यांच्याजवळ आलेला कार्यकर्ता त्यांच्यापासून कधीही दूर गेला नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुख-दुःखात तात्या आधार वाटायचे.

तात्यांमुळे जिल्हा बॅंक अग्रस्थानावर
राजेंद्र राजपुरे (संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक) -
 संघटन कौशल्य, अचूक निर्णयक्षमता, सहकारातील मोठा अनुभव आणि तात्यांच्या मार्गदर्शनावर जिल्हा बॅंक आज अग्रस्थानावर आहे.   

लक्ष्मणराव पाटील - जीवनपट
    बोपेगाव (ता. वाई) येथे जन्म - २५ फेब्रुवारी १९३८
    वडील पांडुरंग पाटील यांचा मृत्यू - १९४४
    बोपेगाव येथे शालेय जीवनात पदार्पण - १९४५
    पीएमसी परीक्षेत सुयश आणि माध्यमिक शिक्षणासाठी सुरूर 
    येथील शिवाजी विद्यालयात प्रवेश - १९५३
    महाविद्यालयीन शिक्षणाचा पुणे येथे प्रारंभ -- १९५८
    वडील बंधू रामराव पाटील यांना अकस्मात मृत्यू - २८ जुलै १९६०
    कुटुंबप्रमुखाची जबाबदारी स्वीकारली - १९६० 
    बोपेगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन - १९६० ते ६७
    बोपेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड - १९६० ते ६७ 
    करंदी (ता. भोर) येथील दगडोबा बोरगे-पाटील यांची कन्या 
    सौ. सुमन यांच्याशी विवाहबद्ध - १९६१
    आजी श्रीमती चांगुणाबाई यांचा मृत्यू - १९६७
    वाई तालुका पंचायत समितीचे सदस्य - १९६७ ते ७२ 
    वाई तालुका काँग्रेस समितीचे सेक्रेटरी - १९६७ ते ७४
    वाई तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमन - १९६९ ते ७५
    वाई तालुका पंचायत समितीचे सभापती - १९७२ ते ८०
    सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक - १९७२ ते ७५
    कृष्णा व्हॅली दूध पुरवठा संघ वाईचे संचालक - १९७२ ते ७५ 
    जनता शिक्षण संस्था वाईच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य - १९७२ 
    भुईंज येथील सातारा सहकारी साखर कारखाना 
    संचालक मंडळाचे सदस्य - १९७४ ते ९२
    जनता शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त - १९७८ 
    सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष - १९८० ते ९०
    सातारा जिल्हा विकास मंडळ सदस्य - १९८० ते ९०
    सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक - १९८० ते ९५
    जिल्हा औद्योगिक सल्लागार मंडळाचे सदस्य - १९८० ते ९०
    जिल्हा कायदेविषयक सल्लागार समितीचे सदस्य - १९८० ते ९०
    जिल्हा अस्पृश्‍यता निवारण व दक्षता समितीचे सदस्य - १९८० ते ९०
    जिल्हा पीक संरक्षण औषधे निवड समिती सदस्य - १९८० ते ९०
    कृषीपंढरी जिल्हा समन्वय समितीचे उपाध्यक्ष - १९८० ते ९० 
    जिल्हा बियाणे वाटप समितीचे सदस्य - १९८० ते ९०
    मातोश्री बनूबाई यांचा मृत्यू - १९८१
    अखिल भारतीय पंचायत राज परिषदेवर निवड - १९८१
    अध्यक्षपदाच्या काळात जिल्हा परिषदेस १९८० ते ८१ 
    कुटुंब नियोजन कार्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल 
    पाच लाखांचे पारितोषिक व फिरती ढाल - १९८१
    अध्यक्षपदाच्या काळात जिल्हा परिषदेस १९८१ ते ८२ मध्ये 
    कुटुंब नियोजन कार्यक्रमात पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे 
    पारितोषिक - १९८२
    राज्य ग्रंथालय संघाच्या नियामक मंडळाचे सदस्य - १९८३ ते ८४ 
    वीस कलमी कार्यक्रम, ग्रामीण विकास, आणि गोबर गॅस 
    सयंत्र उभारणी कार्यक्रमाबद्दल महाराष्ट्र शासनाचे प्रथम क्रमांकाचे 
    पारितोषिक - १९८३ ते ८४ 
    आरोग्य खात्याच्या योजनेतून विदेश दौरा- सिंगापूर, ब्रह्मदेश, 
    इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड असा अभ्यास दौरा - १९८५
    राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड - १९८६
    किसन वीर साखर कारखान्याचे संचालक - १९९२ ते ९५
    किसन वीर साखर कारखन्याचे चेअरमन - १९९५ ते ९९ 
    सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष - १९९९
    सातारा लोकसभा मतदारसंघातून संसद सदस्य (खासदार) १९९९  

Web Title: laxmanrao Patil Sharad Pawar Politics