लेझीमच्या तालाचा आयुष्यात सुंदर फेर

सुधाकर काशिद
शुक्रवार, 12 मे 2017

खोलखंडोबा परिसरातील २५० आबालवृद्ध रोज लेझीम खेळू लागले

खोलखंडोबा परिसरातील २५० आबालवृद्ध रोज लेझीम खेळू लागले
कोल्हापूर - या मे महिन्याच्या सुटीचा ज्याने त्याने आपल्या परीने आनंद घेतला. पण कोल्हापुरातल्या २५० अाबालवृद्धांच्या आयुष्यात मात्र या मे महिन्यात लेझीमच्या तालाने सुंदर फेर धरला. वय, आजार, प्रतिष्ठा हे सारे पूर्ण विसरून त्यांनी लेझीमच्या ठेक्‍यावर आपल्यातील दडलेल्या एका गुणाचा अाविष्कार सादर केला. आपले आई-बाबा; एवढेच नव्हे तर काका-काकी, आजी-आजोबा, हलगी घुमक्‍याच्या तालावर मनसोक्‍त नाचताना पाहून मुलांनी तर जल्लोषच केला. या सर्वांना लेझीम शिकवण्याची किंबहुना प्रत्येकाच्या मनात दडून राहिलेल्या लेझीमच्या तालावर फेर धरायची ही संधी तीन सामाजिक संस्थांनी मिळवून दिली आणि लेझीम या खेळ व व्यायाम प्रकाराची परंपराही पुन्हा जिवंत केली. 

शुक्रवार पेठेतील खोलखंडोबा हॉलमध्ये रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत लेझीमचा हा फेर रंगतो. या हॉलमध्ये हलगी, घुमके, कडाडू लागले की आसपासची मंडळी लेझीम घेऊन हॉलकडे येऊ लागतात. बघता बघता मुले, मुली, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनी हा परिसर फुलून जातो. लेझीम हातात घेऊन व्यवस्थित रांग लावली जाते. हलगीतून एक ताल सुरू केला जातो. त्यावर लेझीमचा फेर सुरू होतो. काही आजी-आजोबांना लगेच फेर धरता येत नाही. त्यामुळे घाई केली जात नाही. हळूहळू ताल जमू लागतो. फेरही आकार धरू लागतो आणि सुमारे तास - दीड तास हा फेर रंगतो. काही काकू चक्क पदर खोचतात, काही आजोबा खेळता खेळता शिट्या घालतात, तरुण मुले तर बेभान होतात. लेझीम खेळणाऱ्यांना पाहण्यासाठी बाजूला उभे राहणारेही टाळ्या वाजवून, ओरडून प्रोत्साहन देतात. 

लेझीममुळे शरीराला खूप चांगला व्यायाम आणि मनाला खूप सारा आनंद होतो, अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया आहे. इतर व्यायाम करताना अवयवांवर ताण पडतो. त्यामुळे व्यायाम हातचे राखून करण्यावर अनेकांचा भर असतो. लेझीम खेळतानाही ताण जरूर पडतो. पण लयदार हालचालीत हा ताण असल्यामुळे तो मनापासून स्वीकारला जातो. लेझीम खेळताना किती वेळा कंबर हालते, किती वेळा हाताची-पायाची हालचाल होते याचा हिशेबच नसतो. त्यामुळे लयदार तालावर हा व्यायाम होतो. घामाने शरीराचा कानाकोपरा भिजतो. तासाभराने दमून सर्वजण थांबले की घामातूनच शरीराचा गारवा जाणवू लागतो. लेझीम खेळायला येणाऱ्यांत पन्नास वयाच्या पुढचे दहा-पंधरा जण आहेत. वजन वाढले म्हणून घरातच बसून राहणारे लेझीम खेळायला पुढे आहेत. या सर्वांना अतुल कुंभार हे काडसिद्धेश्‍वर हायस्कूलचे शिक्षक लेझीम शिकवतात.

यांचे सहकार्य...
लेझीमचा हा खेळ शिवगर्जना, ॲड. (कै.) शामराव शिंदे फाऊंडेशन व आमदार राजेश क्षीरसागर प्रतिष्ठान यांच्या वतीने रंगतो. सुनील करंबे, माधुरी करंबे व नितीन मुधाळे हे संयोजन करतात.

लेझीममुळे पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. भूक लागते, झोप चांगली लागते, पचनक्रिया व्यवस्थित होते. अर्थात भूक, झोप व पचनक्रिया व्यवस्थित असली की रोग जवळ येत नाही. लेझीम या व्यायाम प्रकारात हे गुण आहेत आणि नाचत, खेळत, आनंदात, उत्साहात जल्लोषाची लेझीमला जोड मिळत असल्याने आळशी माणूसही एकदा लेझीम खेळायला आला की तो आळसच विसरतो. 
- अतुल कुंभार, लेझीम प्रशिक्षक

Web Title: lazim game is very beautiful