अर्ज माघारीसाठी आता नेत्यांकडून धावपळ

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

नगर- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात विक्रमी अर्ज दाखल झाले. राज्यात शिवसेना-भाजपमध्ये कडवडपण येऊन युती झाली नसली तरी जिल्ह्याच्या उत्तरेतील काही तालुक्‍यांत दोन्ही पक्षांनी जुळवून घेतले. दक्षिण जिल्ह्यात श्रीगोंदे व नगर तालुक्‍यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसने हातमिळवणी केली. मात्र सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचा धोका वाढला. एकिकडे निवडणुकीचे डावपेच खेळायचे, अन्‌ दुसरीकडे या बंडोबांना थंड करायचे, अशा कात्रीत सर्वच पक्षांचे नेते सापडले आहेत.

नगर- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात विक्रमी अर्ज दाखल झाले. राज्यात शिवसेना-भाजपमध्ये कडवडपण येऊन युती झाली नसली तरी जिल्ह्याच्या उत्तरेतील काही तालुक्‍यांत दोन्ही पक्षांनी जुळवून घेतले. दक्षिण जिल्ह्यात श्रीगोंदे व नगर तालुक्‍यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसने हातमिळवणी केली. मात्र सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचा धोका वाढला. एकिकडे निवडणुकीचे डावपेच खेळायचे, अन्‌ दुसरीकडे या बंडोबांना थंड करायचे, अशा कात्रीत सर्वच पक्षांचे नेते सापडले आहेत.

जिल्हा परिषदेच्या 73 गटासाठी 898 अर्ज वैध ठरले. पंचायत समिती गणांच्या 146 जागांसाठी एक हजार 588 अर्ज दाखल झाले. त्यापैकी छाननीनंतर एक हजार 527 अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली. ही अर्जाची मोठी संख्याच नेत्यांची डोकेदुखी ठरली आहे. अर्ज मागे घेण्याची विनंती करताना सर्वच मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. त्यातच जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्‍यता आहे. खरं तर त्यासाठीच काही उमेदवारांनी अर्ज भरल्याचे माघारी घेतल्यानंतर लक्षात येते, हे सर्वसामान्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. या चर्चेमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारापेक्षा एकमेकांचे अर्ज कसे ठेवता येतील, किंवा काढून घेता येतील, याचे आडाखे बांधले जात आहे.

जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपने चांगली पकड घेतली आहे. नुकत्याच झालेल्या पालिकांच्या निवडणुकांवरून हे स्पष्ट झाले आहे. खरं तर जिल्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. पण आता या बालेकिल्ल्याचे अनेक बुरुज ढासळले आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर वर्चस्व सिद्ध करण्यास भाजप किती प्रमाणात यशस्वी होईल या विषयांवर खलबते सुरू आहेत. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता, मोदी पॅटर्न सध्या युवा वर्गाला आकर्षित करीत आहे. भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. कोणताच पक्ष सर्वांना न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे नाराजांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बंडखोरीला उधाण आले आहे. हीच स्थिती कॉंग्रेस व राष्ट्रवादीचीही झाली आहे. बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून "डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. बहुतेक गटात नाराज कार्यकर्त्यांनी स्वतंत्र आघाडी करण्याचे नियोजन केलेले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

निवडणुकीदरम्यान राज्य पातळीवरील नेत्यांचा प्रचार दौरा आपल्या गटात होण्यासाठी बहुतेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कसे वाटोळे केले यावर राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडून भर दिला जाणार आहे, तर नोटाबंदीमुळे काळा पैसा कोणाचा व कसा बाहेर काढला, या मुद्‌द्‌यांवर भाजपने जोर दिलेला दिसतो.

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत बहुतेक पक्षाचे कार्यकर्ते सध्या व्यस्त होते. आता तिकडचे मतदान झाल्याने हे कार्यकर्ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला जुंपले आहे. सात तारखेला माघार झाल्यानंतर जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र अर्ज माघारी घेण्यासाठीची कसरत सर्वच नेत्यांना करावी लागणार आहे.

घोडेबाजार शक्‍य
बंडखोरीच्या फटक्‍यामुळे काही गटांत अपक्ष उमेदवार भाव खावून जातील. या भितीने अशा उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या जात आहेत. त्याचाच परिणाम घोडेबाजार उधाळणार आहे. रिंगणात असलेल्या अपक्ष व नाराज गटाची मनधरणी करण्यासाठीही हा बाजार तेजीत राहिल, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

Web Title: leaders rush to withdraw application