Sangli News : एलईडी, भाजी मंडईवरून गोंधळ

‘मंडई बेकायदेशीर’चा आरोप; भाजपकडून महापौर आरोपीच्या पिंजऱ्यात
Sangli News : एलईडी, भाजी मंडईवरून गोंधळ

सांगली : महापालिका क्षेत्रात बसवलेले एलईडी दिवे व भाजी मंडईवरून आज महासभेत गोंधळ झाला. गुलाब कॉलनीतील भाजी मंडई बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत भाजपने महापौरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

वसंतदादा पाटील सभागृहात आज महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आयुक्त सुनील पवार उपस्थित होते. सुरवातीलाच भाजप सदस्यांनी एलईडीवरून फलक घेऊन घोषणाबाजी केली.

सभागृह नेत्या भारती दिगडे, विवेक कांबळे, विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, कल्पना कोळेकर, सविता मदने आदी भाजप नगरसेवकांनी महापौरांसमोर घोषणाबाजी केली. एलईडीच्या कारभाराची चौकशी करावी, कराराची श्वेतपत्रिका काढावी, ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका, अशी मागणी केली.

समुद्रा कंपनीला दिलेली मुदत संपली तरी बऱ्याचशा भागात एलईडी बसले नाहीत. घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण वाढलेत, असे आरोप केले. दिगडे म्हणाल्या, बिल थकल्याने साहित्य पुरवठा करणार नसल्याचे सांगितले जात आहे. ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका. प्रकाश ढगे यांनी अडीच कोटीचे बिल काढल्याचे समजते.

बील काढले तर एलईडी का बसवत नाही याचा जाब विचारा, अशी मागणी केली. आयुक्त पवार म्हणाले, ‘‘जवळपास ३२ हजार दिवे बसवायचे आहेत. किती एनर्जी बचत होते, ते तपासावे लागेल. ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे. ठेकेदाराला ५० टक्के बिल दिलेय. जिथे दिवे नाहीत तेथे दिवे लावण्यात येतील. काही ठिकाणी कमी-जास्त वॅटचे दिवे लावण्यात आलेत. ते बदलावे लागतील. ठेकेदाराची मुदत संपली. ती वाढवून द्यावी लागेल.’’

समुद्रा कंपनीबरोबरचा करार इंग्रजीतून मराठीत करून न दिल्याबद्दलही सदस्यांनी संताप व्यक्त केला. विजय घाडगे यांनी एलईडी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी केली. विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी धोरणात्मक निर्णयाची माहिती मराठीत का देत नाहीत, असा सवाल केला. महापौर सूर्यवंशी यांनी पुढच्या आठवड्यात करार पत्र मराठीत देण्याची सूचना केली. ‘समुद्रा’च्या प्रतिनिधीसोबत नगरसेवकांची बैठक घेऊन माहिती द्यावी, असेही आदेश दिले.

महापौरांवर दुजाभावाचा आरोप

भाजपच्या नगरसेवकांनी गुलाब कॉलनीतील भाजी मंडईचे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. महापौरांनी कोणताही ठराव न करता, प्रशासनाला माहिती न देता हे बांधकाम करून घेतल्याचा आरोप करत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. महापौरांनी भाजी मंडईला शासनाकडून निधी आणला आहे.

‘सार्वजनिक बांधकाम’ने आराखडा करून निविदा काढून काम केले. महापालिकेनेही एनओसी दिल्याचे स्पष्ट केले. समाधान न झाल्याने नवलाईंनी आयुक्तांना खुलासा करण्याची मागणी केली. नगरसेविका गीतांजली ढोपे-पाटील यांनीही चिल्ड्रन पार्कला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यास टाळाटाळ करून महापौर दुजाभाव करत असल्याचा आरोप केला.

यावरून सभागृहातील वातावरण तंग झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांनी महापौरांची बाजू घेत त्यांच्या विजयाच्या, तर भाजप नगरसेवकांनी धिक्काराच्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे अभिजित भोसले १६ एकरच्या आरक्षित जागेत स्केटिंग, ऑफिसर क्लब, नाट्यगृह भाजी मंडई असा आराखडा तयार केला आहे. त्यातीलच ही भाजी मंडई आहे. भाजप सदस्यांनी महापौरांनी ठराव दाखवावा, अशी मागणी लावून धरली. महापौरांनी माहिती देण्याचे मान्य करत सदस्यांना शांत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com