बिबट्या शिरतोय वस्तीत; लोकांमध्ये धास्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कऱ्हाड - तालुक्‍यात सुमारे चाळीसहून अधिक गावांत बिबट्याच्या वावर असल्याच्या नोंदी वन विभागाकडे आहेत. गावातील नागरी वस्ती वाढत असताना, आतापर्यंतच्या पाच वर्षांत सुमारे ३०० पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने तो नागरी वस्तीकडे वळत असताना, लोकांमध्ये मात्र त्याची धास्ती वाढत आहे. त्यामुळे मानवाविरुद्ध बिबट्याचा संघर्ष या पुढच्या काळात अधिक तीव्र होतो की काय? अशीही स्थिती असल्याने त्यावर पर्याय शोधण्यासाठी वनखात्याला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. 

तालुक्‍याचा विंग, पाठरवाडी, तांबवे, आणे, येणके भागात बिबट्या दिसतो असे सांगितले जायचे. कधीतरी तो गावातही उतरायचा. पण, हल्ल्यांचे सत्र नव्हते. अलीकडे मात्र बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आगाशिवच्या डोंगरात रोजचाच नव्हे तर त्या गडाच्या डांगराई देवीच्या परिसरात त्याची वस्तीच झाली आहे. त्यामुळे तो रात्री खाली उतरून कधी आगाशिवनगर, जखीणवाडी, नांदलापूर, काले, धोंडेवाडी, ओंडमार्गे तालुक्‍याच्या अन्य भागातही दिसू लागला आहे. 

तालुक्‍यातील वन विभागाच्या हद्दीत १३ हजार १५३ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यासाठी मलकापूर, कोळे, वराडे व मसूर अशी परिमंडले देखभालीसाठी आहेत. तर चारपैकी तीन परिमंडलांत बिबट्याचा मुक्त संचार आहे. सुमारे सत्तरपेक्षाही जास्त ठिकाणी बिबट्याचा वावर रोजचा झाला आहे. वन विभागाच्या बिटनिहाय बिबट्याचे क्षेत्र वाढत आहे. मलकापुरात ७७० हेक्‍टर, नांदगावात ७२८, कोळेच्या बिटात एक हजार ४०, कासारंशिरबेत ५८८, तांबवेत ९००, म्हासोलीत ८३३, वराडेत एक हजार तीनशे, म्होप्रेत ९१६ तर चोरेत ९५० हेक्‍टरच्या क्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याची नोंद वन विभागाने घेतली आहे. 

पाच वर्षांत बिबट्याने नागरी वस्तीत शिरून मारलेल्या जनावरांची संख्या ३०० वर पोचली आहे. त्यातील सुमारे २५० जनावरांच्या बदल्यात वन खात्याने १० लाख ५० हजारांची नुकसानभरपाई दिली आहे.

...कोठे आढळतो बिबट्या
चाळीसपेक्षा जास्त गावांतील डोंगरांचा पायथा, पाळीव जनावारांच्या गोठ्याचा परिसर येथे दिसणारा बिबट्या आता मानवी वस्तीतील कॉलन्यांतही दिसू लागला आहे. गावाच्या वेशीवरही तो आढळतो आहे. त्यामुळे त्याचा वावर वाढला असल्याचे निश्‍चित असून, त्यांची संख्याही वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

बिबट्याचा तालुक्‍यातील चाळीसपेक्षा जास्त गावांत वावर वाढला आहे. बहुतांश वेळा तो पाळीव जनावरांवर हल्ले करत आहे. त्यामुळे त्याचा आधिवास वाढत असून, त्याला संरक्षण देण्यासाठी वन खात्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. बिबट्या संवर्धन केंद्रासारखा एखादा प्रकल्प येथे आणण्याची गरज आहे.
- रोहन भाटे, पर्यावरण अभ्यासक, माजी मानद वन्यजीव रक्षक 

Web Title: Leopard