बिबट्या हरला अन्‌ आजी जिंकली!

Leopard
Leopard

ढेबेवाडी - वेळ दुपारी एकची...ठिकाण पाटण तालुक्‍यातील जिंती जवळच्या नवीवाडीचे शिवार... नेहमीप्रमाणे आजीबाई गावाजवळच्या शिवारात शेळ्यांचा कळप चारण्यासाठी घेऊन निघाल्या असताना पायवाटेशेजारी गवतात दबा धरून बसलेला बिबट्या क्षणात कळपातील पुढच्या शेळीला पकडून खसकन आत ओढतो...अचानक शेळी गवतात कशी ओढली गेली हे बघायला आजीबाई तिकडे धावतात अन्‌ सुरू होते शेळीला वाचविण्यासाठी आजी आणि बिबट्याची लढाई ... सुमारे २० मिनिटे चाललेल्या या झटापटीत अखेर आजीच बाजी मारते अन्‌ शेळीला तिथेच टाकून बिबट्याला जंगलाकडे धूम ठोकावी लागते. श्रीमती गंगुबाई ज्ञानदेव अनुते (वय ७५) असे या धाडसी आजीबाईचे नाव आहे. थक्क करणाऱ्या या धाडसाबद्दल परिसरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.           

जिंतीजवळच्या डोंगरात वसलेली नवीवाडी रस्त्यासह विविध सुविधांपासून वंचित आहे. तेथील गंगुबाई अनुते घरी एकट्याच राहतात. पाळलेल्या पाच शेळ्यांवर त्यांची उपजीविका चालते. काल दुपारी नेहमीप्रमाणे त्या गावाजवळच्या पांगवळणे नावाच्या शिवारात शेळ्या चारण्यासाठी घेऊन निघाल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास शिवारातील पायवाटेच्या कडेला उंच वाढलेल्या गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील सर्वांत पुढे असलेल्या शेळीला पकडून खसकन गवतात ओढले. अचानक शेळी डोळ्यासमोरून दिसेनाशी झाल्यामुळे गंगुबाई लगबगीने तिकडे धावल्या त्यावेळी त्यांना शेळीचा गळा पंजाने पकडून तिच्या अंगावर बसलेला बिबट्या दिसला. शेळीची सुटका करण्यासाठी हातातील काठीने त्यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत मदतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरडाही सुरू केला. परंतु, निर्जन शिवारात त्यांचा आवाज कुणाच्याही कानावर पोचला नाही. एकीकडे बिबट्या शेळीचा गळा जबड्यात पकडण्याचा आणि दुसरीकडे या आजीबाई त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होत्या. तब्बल २० मिनिटे हा थरार सुरू होता. अखेर आजीबाई व तिच्या काठीपुढे बिबट्याने माघार घेऊन शेळीला तेथेच टाकून जंगलाकडे धूम ठोकली. जिवावर बेतण्याऱ्या या लढाईत बिबट्याशी तोंड देताना गंगुबाई भीतीने अर्धमेल्या झाल्या होत्या. बाकीच्या शेळ्याही घाबरून पुढे पळून गेल्या होत्या. जखमी शेळीला घेऊन अक्षरशः सरपटत तिथपर्यंत गेल्या आणि सर्व शेळ्यांसह घराकडे पळत सुटल्या. बिबट्याला उगारलेल्या काठीचे काही फटके झटापटीत स्वतःच्याही पायावर बसल्याने गंगुबाई किरकोळ जखमी झाल्या आहेत. गळ्याला बिबट्याच्या नख्या लागल्यामुळे शेळीलाही दुखापत झाली आहे. शेळी व स्वतःवरील उपचारासाठी आज त्या डोंगर उतरून जिंतीत आल्या होत्या.

या ईपरित यळंला हातापायातं कुठनं एवढं बळ आलं ह्येच कळलं न्हाय. आमच्या दुघींचभी मरानंच समुरं उभं हुतं. पण, म्या तिला शेवटपर्यंत नेवू दिलं न्हाय. पाळल्यालं जनावर म्हंजी शेतकऱ्याचा जीवच असतुं की ओ...    
- श्रीमती गंगुबाई अनुते, नवीवाडी-जिंती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com