नगर : बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

लघुशंकेसाठी पहाटे साडेपाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) येथील ज्येष्ठ महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झाला.

निघोज : लघुशंकेसाठी पहाटे साडेपाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या वडनेर बुद्रुक (ता. पारनेर) येथील ज्येष्ठ महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झाला.

राधाबाई कारभारी वाजे (वय 69), असे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या या वृद्धेचे नाव असून, घरापासून अगदी दोनशे फुटांवर तिच्यावर हल्ला झाला. घरातून बाहेर पडलेली आजी बराच वेळ झाला तरी पुन्हा आली नाही म्हणून त्यांचा मुलगा दत्तात्रेय कारभारी वाजे यांनी बाहेर येऊन तिचा शोध घेतला.

त्यावेळी त्यांना घरापासून दोनशे फुट अंतरावर आजीचा मृतदेह दिसला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आजीच्या शरीराचा काही भागच शिल्लक राहिलेला पाहून दत्तात्रेय यांनी हंबरडा फोडला. त्यानंतर तेथे परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली.

वडनेर बुद्रक व वाजेवाडी शिवारात गेल्या 25 दिवसांपासून तीन बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्या भागातील गणपत येवले, रामभाऊ पवार, भिका येवले, रामदास मेचे, अनिल नऱ्हे, नाना ठोंबरे या शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांच्या मागणीवरुन या भागात दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र, बिबटे पकडण्यासाठी वनविभागाने विशेष प्रयत्न केले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.

वडनेर व वाजेवाडीसह शिरापूर, म्हस्केवाडी या भागातही जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. यापूर्वी 3 ऑगस्टला शिरापूर येथील द्विग्विजय उचाळे (वय 19) हा युवक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला होता.

त्याच्याशी दहा मिनिटे बिबट्याची झटापट सुरु होती. सुर्देवाने आरडाओरडा केल्याने तो वाचला. दरम्यान, आज झालेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस व वन विभागाचे कर्मचारी पोचले आहेत. बिबटे पकडण्यासाठी खास मोहीम हाती घेण्याची मागणीने आज जोर धरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard attacks older women in Nagar