बिबिट्या घरात अन्‌ माणस दारात..(video)

सनी सोनावळे 
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथे कुत्र्याच्या पिल्लांमागे धावणारा बिबट्या थेट घरात घुसला. कुत्र्याचे पिल्लू निसटले मात्र, बिबट्या घरात अडकला. घरातील सदस्य दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडले आणि दोन्ही दरवाजे बंद केले. वनविभागाच्या दोन तासांच्या रेस्क्‍यूनंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला.

टाकळी ढोकेश्वर : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथे कुत्र्याच्या पिल्लांमागे धावणारा बिबट्या थेट घरात घुसला. कुत्र्याचे पिल्लू निसटले मात्र, बिबट्या घरात अडकला. घरातील सदस्य दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडले आणि दोन्ही दरवाजे बंद केले. वनविभागाच्या दोन तासांच्या रेस्क्‍यूनंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. पिंपळगाव रोठा(ता. पारनेर) येथील रोटोबा वस्तीवर रात्री दहा वाजता ही घटना घडली. 

अधिक माहिती अशी, पिंपळगाव रोठा गावातील रोटोबा मळ्याजवळील वस्तीजवळील दिलीप जगताप यांच्या घरात कुत्र्याच्या पिल्लांमागे धावत असणारा बिबट्या थेट घरात घुसला. यावेळी घरामध्ये जगताप यांचे आई, पत्नी, दोन छोट्या मुली एक पाहुणा असे सहा जण घरात होते.

बिबट्या घरात घुसला 

बिबट्या घरात घुसला त्यावेळी सर्वांचीच पाचावरधारण बसली. हा थरारक प्रसंग त्यांनी डोळ्यादेखत पाहिला. पण, प्रसंगावधान राखत दुसऱ्या दरवाजातून घरातील सर्वजण बाहेर पडले आणि दोन्ही दरवाजे बंद केले. या सर्व गोंधळात कुत्र्याचे पिल्लू देखील छोट्या खिडकीतून बाहेर पडले. मात्र, बिबट्या घरातच अडकला. या थरारक प्रसंगाची माहिती सरपंच अशोक घुले यांनी वनविभागास दिली. 

बिबट्याला बेशुद्ध केले 

त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी लगेच माणिकडोह बिबट बचाव केंद्र, (ता. जुन्नर) यांना कळविले. माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीम, वनविभाग पारनेर यांनी संयुक्तरित्या रेस्क्‍यू ऑपरेशन राबविले. बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या बाहेर काढले आणि पिंजऱ्यात जेरबंद केले. काल संध्याकाळी दहा वाजता बिबट्या पिंजऱ्यात पकडल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी पसिरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

leopard

 

त्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला 

दिवस-रात्र सतत बिबट्या निदर्शनास येत असल्याने वस्तीवरील लोक धास्तावले होते. वस्तीवर म्हशी, गायी, शेळ्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आज हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समजताच येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. असे असले तरी परिसरात अजूनही बिबटे असण्याची शक्‍यता असल्याने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

रेक्‍स्यू ऑपरेशन करणाऱ्यांचा सत्कार 

रेस्क्‍यू ऑपरेशन राबविणाऱ्या माणिकडोट येथील बिबट बचाव केंद्राचे डॉ. अजय देशमुख, धोंडू कोकणे, वैभव नेहरकर, आकाश डोळस आणि जुन्नर गाकवरी अजिंक्‍य भालेराव, नवनाथ गायकवाड, सतीश घाडगे, करण घाडगे, आकाश माळी तसेच, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांच्यासह सर्व टीमचा पिंपळगाव रोठा ग्रामस्थांनी सत्कार केला. 

leopard cot

बिबट्याला जेरबंद 

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिटट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. सात वाजता घटना घडल्यानंतर तातडीने वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री साडेदहा वाजता बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. - सुनील थिटे, वनपरिक्षेत्र अधिकारी नगर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard Caught in a cage