(व्हिडिओ) बिबट्यालाही पाजले "त्या'ने पाणी

विलास कुलकर्णी
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

रामपूर येथील खळदकर दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी घास कापण्यासाठी शेतात गेले होते. घासाचे पहिले ओझे पती रविराज यांनी नेले, तर नयना दुसरे ओझे बांधण्याच्या तयारीत गुंतल्या होत्या.

राहुरी :  घासाचे ओझे उचलत असताना बिबट्याने तिच्यावर अचानक झडप घातली. बिबट्या मोठ्या त्वेषाने तिच्यावर तुटून पडला. घाबरलेली ती कसा तरी, असहायपणे त्याचा प्रतिकार करीत होती. संपले संगळे, असे वाटत असतानाच "चिंट्या'ने बिबट्यावर झेप घातली. त्याचा तो रुद्रावतार पाहून बिबट्याही मागे हटला नि आल्या पावली परतला. तिच्यासाठी "चिंट्या' हीरो ठरला. 

हेही वाचा पंचनामा सुरू असताना "त्याने' पळविली शेळी!

नयना रविराज खळदकर (रा. रामपूर), असे या महिलेचे, तर "चिंट्या' हे त्यांच्या पाळीव कुत्र्याचे नाव. रामपूर (ता. राहुरी) येथे काल (मंगळवारी) सायंकाळी साडेचार वाजता हा थरार घडला. 

nayana khaladkar

नयना रविराज खळदकर 

असा घडला थरार

रामपूर येथील खळदकर दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी घास कापण्यासाठी शेतात गेले होते. घासाचे पहिले ओझे पती रविराज यांनी नेले, तर नयना दुसरे ओझे बांधण्याच्या तयारीत गुंतल्या होत्या. पाळीव कुत्रा "चिंट्या' जवळच लुडबूड करीत होता. शेजारील उसाच्या फडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक नयना यांच्या अंगावर झेप घेतली. अचानक झालेल्या हल्ल्याने नयना जमिनीवर कोसळल्या. गोंधळून, घाबरून गेल्या. त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. 

chintya dogs

बिबट्याला पळवून लावणारा चिंट्या.

अखेर बिबट्याची माघार 
असहाय मालकिणीस पाहून, धोक्‍याची जाणीव होताच इमानदार "चिंट्या'ने त्वेषाने भुंकत बिबट्यावरच हल्ला चढविला. अचानक झालेल्या प्रतिहल्ल्याने बिबट्याही गोंधळला. तोपर्यंत हा प्रकार शेजारील शेतकऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा सुरू केल्यावर बिबट्याने माघार घेतली. हाताशी आलेले सावज सोडून, तो आल्या पावली परत उसाच्या फडात गायब झाला. बिबट्याच्या हल्ल्यात नयना किरकोळ जखमी झाल्या; मात्र "चिंट्या'मुळे त्यांचे प्राण वाचले. घटनेचा थरार सांगतानाही नयना यांच्या अंगावर काटा येत होता. "आमच्या "चिंट्या'मुळेच माझे प्राण वाचले,' असे सांगताना त्यांचा ऊर भरून येत होता.

पिंजरा लावण्याची मागणी 
दरम्यान, रामपूर परिसरात बऱ्याच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जायला शेतकरी धजावत नाहीत. आता नयना यांच्यावर दिवसाढवळ्या बिबट्याने हल्ला केल्याने, शेतात कामे कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. रामपूर परिसरात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात वन खात्याने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अमोल नालकर, नितीन खळदकर, फकीर नालकर, नानासाहेब नालकर, संतोष साबळे, दत्तात्रेय नालकर, बाबासाहेब खळदकर, प्रशांत मोरे, अरुण साबळे, किरण साबळे, गोविंद मोरे, राजेंद्र थोरात यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard retreat infront of dog