पन्हाळा - पावनगड परिसरात बिबट्याचा वावर (व्हिडिओ)

पन्हाळा - पावनगड परिसरात बिबट्याचा वावर (व्हिडिओ)

पन्हाळा - पन्हाळगडाशेजारच्या पावनगड परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर लगेच सोशल मीडियावर पन्हाळ्यात ‘ब्लॅक पॅंथर’ आल्याची पोस्ट व्हायरल झाल्याने पावनगडाकडे लोकांच्या रांगा लागल्या, पण तो ब्लॅक पॅंथर नसून बिबट्याच असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका दळवी यांनी सांगितले.

सकाळी साडेसहाला पावनगडावरील दर्ग्याशेजारील मशिदीत नासीर मुजावर हे सकाळची नमाज आटोपून घरी परतत होते, त्या वेळी त्यांना तटबंदीखाली माकडांचा चित्कार ऐकू आला म्हणून ते तटबंदीवर गेले आणि ते वाकून बघू लागले, त्यावेळी त्यांना पाण्याच्या झरीशेजारून काळसर बिबट्या जंगलातील पायवाटेने राक्षीकडील बाजूस जाताना दिसला, त्यांनी आपला मुलगा असिफ याला बोलावून बिबट्या दाखविला. त्याने बिबट्या पायवाटेने चालत निघाल्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घेतले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. सावलीमुळे हा बिबट्या काळसर दिसत असल्याने तो ‘ब्लॅक पॅंथर’ असल्याचा लोकांचा समज झाला, आणि हीच बातमी पन्हाळ्यासह कोल्हापूर परिसरात पसरली.

नासीर यांच्या सांगण्यानुसार हा बिबट्या एका माकडाचा पाठलाग करीत साधारण एक किलोमीटरपर्यंत गेला, आणि एका झुडपाशेजारी दबा धरून बसला. पण, माकडाची शिकार त्याच्या हातून निसटल्याने तो खालील बाजूस दगडकपारीत निघून गेला. कालपासून पावनगडाच्या खालील बाजूच्या वनहद्दीत आग लागली आहे, ती आजही झाडाझुडपांना गिळंकृत करीत वाऱ्याच्या झोताबरोबर पुढे सरकत होती. आगीमुळेच दगडकपारीत विसावलेला बिबट्या तटबंदीशेजारी आला असण्याची शक्‍यता आहे.

पावनगडाच्या खालील बाजूस तसेच मार्तंड परिसरात गवे, भेकर, ससे, साळिंदर, माकडे भरपूर असल्याने या परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असते. पावनगडावर अवघी १२ ते १५ घरे असून, वस्ती ४० ते ५० लोकांची आहे. तेथील मुले शाळेसाठी रोज पन्हाळा अगर बुधवार पेठेतील नरके पब्लिक स्कूलमध्ये जातात. त्यांना ही जंगली जनावरे दिसतात, पण रोजचीच सवय असल्याने ती बिनदिक्‍कत जंगलातील डोंगर उतरून रोज ये-जा करतात.

पावनगडनजीक दिसलेला प्राणी ब्लॅक पॅंथर नसून बिबट्या आहे. त्याच्या अंगावर ठिपके आहेत. त्वचेचा रंग ठरविण्याचे काम करणाऱ्या मेलिनीन रंगद्रव्याचे जास्त प्रमाण झाल्यास प्राण्यांचे रंग गडद दिसतात. त्यामुळे पाहणाऱ्यांचा गैरसमज झाला असावा. पन्हाळा- पावनगड परिसरात बिबटे आहेत, त्यांना भेकर, ससे, माकडे असे भरपूर खाद्य आहे. त्यांची संख्या सांगणे अवघड असले तरी हे जंगल समृद्ध असल्याचे यावरून सिद्ध होते.
- प्रियांका दळवी,
वनाधिकारी, परिक्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com