बिबट्या समोर आल्याने आजरा तालुक्यात मजुरांची उडाली भंबेरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

आजरा - जेवणाचे गाठोडे बांधून दगड फोडण्याच्या कामाला जाण्यासाठी मजुरांची कुटुंबं पेरणोली-वझरे रस्त्यावर गेली होती. त्यांचे काम सुरू होते. महिला व पुरुष कामात मग्न होते, मुले रस्त्यावर खेळत होती.

आजरा - जेवणाचे गाठोडे बांधून दगड फोडण्याच्या कामाला जाण्यासाठी मजुरांची कुटुंबं पेरणोली-वझरे रस्त्यावर गेली होती. त्यांचे काम सुरू होते. महिला व पुरुष कामात मग्न होते, मुले रस्त्यावर खेळत होती.

दरम्यान, झाडीतून अचानक काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. त्या दिशेकडे पाहिल्यावर त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. समोर झाडीत बिबट्या उभा होता. बुधवारी (ता. १३) दुपारी एकच्या सुमाराला मजुरांनी हे अनुभवले. वन विभागाच्या पथकाने आज या परिसराची पाहणी केली. त्यांना मातीत उमटलेले बिबट्याच्या पायांचे ठसे मिळाले. तो पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्याचे वनरक्षक कृष्णा डेळेकर यांनी सांगितले. 

मोळ परिसराकडील जंगलाकडे जाणाऱ्या पेरणोली-वझरे रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी मातीत उमटलेले वन्य प्राण्याचे ठसे दिसले होते. हे ठसे तरसाचे असल्याची शक्‍यता वन विभागाकडून व्यक्त होत होती; पण काल प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या जवळ बिबट्या आला होता. तो रस्ता पार करून पठाराच्या दिशेने निघून गेला. याच वेळी शाळकरी मुलांना पोचवण्यासाठी वझरेकडे गेलेल्या पांडुरंग फगरे या चालकाला बिबट्या पाठमोरा दिसला. बिबट्या येथून निघून गेल्याचे मजुरांनी सांगितले. 
दोन दिवसांपूर्वी जेसीबी मशीन चालकाला बिबट्या दिसल्याचे त्याने सांगितले. 

बिबट्याच्या मार्गावर कॅमेरे
वन विभाग बिबट्याची खात्री करून घेण्यासाठी तो वावरत असलेल्या मार्गावर कॅमेरे लावणार आहे. त्याला कॅमेऱ्यात कैद केले जाणार आहे.

Web Title: Leopard seen in Pernoli Vazre road in Ajra Taluka