सांगलीत बिबट्याच्या दर्शनाची चर्चा; रात्रभर शोध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

नागरिकांनो दक्ष राहा-  वनरक्षक आर.एस. पाटील म्हणाले, "वनविभागाच्यावतीने खात्री करण्यासाठी आम्ही रात्रभर आणि पहाटेही गस्त घालत आहोत. बिबट्या असेल किंवा नसेलही. परंतू धोका पत्करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. पहाटेच्या सुमारास एकटे-दुकटे फिरायला बाहेर पडू नये.''

सांगली : विश्रामबाग येथील गव्हर्मेंट कॉलनीत आज बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा रात्रीच्या सुमारास पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागासह प्राणीप्रेमींनी धाव घेतली. महापालिका कर्मचारी आणि पोलिसही घटनास्थळी आले.

रात्रीच्या सुमारास केलेल्या शोधमोहिमेत बिबटया नसून अन्य एखादा प्राणी असावा असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. मात्र पाहिलेला प्राणी हा बिबट्याच असल्याचा दावा स्थानिक रहिवासी तथा कंत्राटदार राजेंद्र पोळ यांनी केला आहे. त्यामुळे वनविभागाने धोका न पत्करता सर्वांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.  

बिबट्या पाहिल्याचा दावा करणाऱ्या राजेंद्र पोळ यांच्या माहितीनुसार गव्हर्मेंट कॉलनीतील युनिव्हर्सल हौसिंग सोसायटीमध्ये ते सायंकाळी साडे सातच्या सुमारास बंगल्यासमोर मोटार लावून आतमध्ये जात होते. तेव्हा त्यांना धप्प करून काहीतरी पडल्याचा आवाज झाला. त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले. तर रस्त्यावर कुत्र्याएवढा वेगळ्या रंगाचा प्राणी दिसला. त्याना तो वेगळा दिसल्यामुळे बंगल्यात जाऊन बॅटरी घेऊन त्या प्राण्यावर प्रकाशझोत टाकला. तेव्हा तो बिबट्या असल्याचे त्यांना जाणवले. तसेच तो त्यांच्या बंगल्यासमोरील श्री. गोटे यांच्या बंगल्यातील गेटमधून आत पळाला. श्री. पोळ यांनी गोटे आणि शेजारील नागरिकांना प्रकार सांगताच त्यांना आश्‍चर्य वाटले. तरीही बिबट्याच असल्याचे खात्रीने सांगून सर्वांना सावध केले.

कॉलनीत बातमी पसरल्यामुळे नागरिक जमले.  प्राणीप्रेमी नागरिकही तत्काळ धावले. वनविभागाला प्रकार कळवताच त्यांचे वनरक्षक व कर्मचारी आले. महापालिका कर्मचारीही आले. श्री. गोटे यांच्या बंगल्यात आवारात जाऊन टॉर्चच्या सहाय्याने शोध घेतला. तसेच आसपासच्या बंगल्यांच्या परिसरातही पालथा घातला. परंतू तेथे कोणताही प्राणी आढळला नाही. बिबट्यासारखाच एखादा प्राणी असावा अशी शक्‍यता प्राणीप्रेमींसह वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.  दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच कॉलनीत नागरिकांची गर्दी झाली. विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. परिसरात चौकाचौकात राहून बिबट्या की अन्य प्राणी याची चर्चा मध्यरात्रीपर्यंत रंगली होती.

नागरिकांनो दक्ष राहा-  वनरक्षक आर.एस. पाटील म्हणाले, "वनविभागाच्यावतीने खात्री करण्यासाठी आम्ही रात्रभर आणि पहाटेही गस्त घालत आहोत. बिबट्या असेल किंवा नसेलही. परंतू धोका पत्करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. पहाटेच्या सुमारास एकटे-दुकटे फिरायला बाहेर पडू नये.''

इजाट असण्याची शक्‍यता-  वन्यजीव अभ्यासक अजित ऊर्फ पापा पाटील म्हणाले,""आम्ही श्री. गोटे यांच्या बंगल्यातील परिसराची पाहणी केली. परंतू कोठेही बिबट्याचे अस्तित्व जाणवले नाही. इजाट असण्याची शक्‍यता वाटते.''

Web Title: leopard seen in Sangli