पंचनामा सुरू असताना "त्याने' पळविली मेंढी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

कुंड वस्ती शिवारातील रामा चोरमले यांच्या शेळीचा मंगळवारी रात्री बिबट्याने फडशा पाडला. तेथील शिंगरूही त्याची शिकार झाले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेळीचा पंचनामा आज दुपारी साडेबारा वाजता सुरू होता. 

निघोज (पारनेर) : बिबट्याच्या हल्ल्यात कुंड वस्ती (निघोज) परिसरातील शेळी व शिंगरू (घोडीचे पिलू) ठार झाले. या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच बिबट्या पुन्हा तेथे आला. अधिकारी- ग्रामस्थांसमोरच त्याने अवघ्या 50 फुटांवरील कळपातून मेंढी पळवून नेली. बिबट्याच्या धाडसाने ग्रामस्थ अक्षरश: गर्भगळीत झाले आहेत. 

निघोज परिसरात गेल्या 15 दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात अनेक शेळ्या, मेंढ्या, कुत्री ठार झाली. बिबट्याने फस्त केली. त्यामुळे या परिसरात बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. कुंड वस्ती शिवारातील रामा चोरमले यांच्या शेळीचा मंगळवारी रात्री बिबट्याने फडशा पाडला. तेथील शिंगरूही त्याची शिकार झाले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेळीचा पंचनामा आज दुपारी साडेबारा वाजता सुरू होता. 

वन परिमंडल अधिकारी महेश साळवे व रंगनाथ वाघमारे, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करीत असतानाच पुन्हा एकदा तेथे बिबट्या आला. 

मेंढीला वाचविण्यासाठी उसात धाव

ग्रामस्थांपासून अवघ्या 50 फुटांवरील कळपातून त्याने मेंढी पळवून नेली. सर्व ग्रामस्थांसमोर बिबट्याने केलेले धाडस पाहून अधिकारी- कर्मचारीही अचंबित झाले. बिबट्याच्या तावडीतून मेंढीला वाचविण्यासाठी सर्वांनी उसाच्या पिकात धाव घेतली. मात्र, उशिरापर्यंत तो सापडला नव्हता. 

पिंजरे लावण्याची ग्वाही

ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, भास्कर वराळ, भीमराव लामखडे, मंगेश वराळ, गजानन ठुबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. वन परिमंडल अधिकारी साळवे यांनी लगेच कुंड वस्ती परिसरात, तसेच लाळगे मळ्यात पिंजरा पाठविण्याचा निर्णय घेतला. तसेच, अन्य ठिकाणीही पिंजरे लावण्यात येतील, अशी ग्वाही दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopards fear in nighoj village