चला भाजपात ; रामराजेंकडे आग्रह

चला भाजपात ; रामराजेंकडे आग्रह

लोणंद-खंडाळा  : "तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. जिथं तुम्ही, तिथं आम्ही आहोतच, अन्यथा वाई मतदारसंघातून निवडणूक लढवा, अशी साद घालतानाच भाजप प्रवेशाचाच निर्णय योग्य ठरेल, असा अप्रत्पक्षपणे सल्ला खंडाळ्यातील नेत्यांनी आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना दिला. या राजकीय घडामोडींची खंडाळा तालुक्‍यात आज दिवसभर चर्चा सुरु होती. 
रामराजेंनी खंडाळा तालुक्‍यातील जेष्ठ नेते व खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुक्‍यातील जेष्ठ नेते बकाजीराव पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे-पाटील, माजी सभापती सुभाषराव साळुंखे, खंडाळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी रामराजे आणि नेत्यांची कंबराबंद बैठक झाली. त्यावेळी या बैठकीत तालुक्‍यातील उपस्थित या सर्व नेत्यांनी "तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. जिथं तुम्ही तिथं आम्ही आहोतच! अन्यथा वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा, अशी साद घालतानाच रामराजेंना भाजप प्रवेशाचाच मार्ग योग्य असल्याचा अप्रत्पक्षपणे सल्ला दिला. 
फलटण-खंडाळा विधानसभा मतदारसंघातून 1995 मध्ये अपक्ष आणि नवखे उमेदवार असलेल्या रामराजेंना गाढवे यांनी स्वतः कॉंग्रेसशी प्रामाणिक राहाताना दुसऱ्या बाजूने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रामराजेंना मोलाची साथ दिली होती. तालुक्‍यातील अन्य नेते व कार्यकर्त्यांनीही रामराजेंची पाठराखण केली होती. त्यामुळे ते पहिल्याच निवडणूकीत दणदणीत मतांनी विजयी झाले होते. मतदारसंघाच्या पुनर्ररचनेनंतर खंडाळा तालुक्‍याचा आणि रामराजेंचा गेली अनेक वर्षे कोणताही राजकीय संबंध उरला नसताना रामराजेंनी मात्र खंडाळ्याशी असलेली नाळ व प्रेम अद्यापपर्यंत जपले. मध्यंतरी व्यक्तिगत पातळीवरचे संबंध कायम ठेवत श्री. गाढवे व रामराजे यांच्यात काहीसा राजकीय दुरावा निर्माण झाला होता. त्यातच किसनवीर उद्योगाचे सर्वेसर्वा माजी आमदार मदन भोसले यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळे श्री. गाढवे यांचीही भाजपची जवळीक वाढली आहे. अनेक वर्षाच्या खंडानंतर पुन्हा एकदा रामराजेंनी श्री. गाढवे यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
गेले अनेक दिवस रामराजेंच्या भाजप व अन्य पक्षातील प्रवेशांबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तशा वावड्याही उडवल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात काहीच घडताना दिसत नव्हते. रामराजेंशी मोबाईलवरून थेट संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही न बोलता "चाललय... काही तरी...' एवढंच नेहमीप्रमाणे सांगून जास्त बोलणे टाळले. 
दरम्यान, चर्चेनंतर रामराजेंनी श्रावणानंतर फलटणच्या राजवाड्यावर या दोन्ही नेत्यांना शाही मेजवानीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात फलटणच्या राजवाड्यात होणाऱ्या मेजवानीला राजकीय महत्त्व आले आहे. 


रामराजेंनी काढलेल्या सेल्फीची चर्चा 
फलटण-लोणंद-खंडाळा असा गाडीतील प्रवासादरम्यान रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुढच्या सिटवरून स्वतः आपल्या मोबाईल मधून मधल्या सीटवर बसलेले खंडाळा तालुक्‍याचे जेष्ठ नेते शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील व रमेश धायगुडे-पाटील यांच्यासमवेत सेल्फी काढला. सोशल मिडियावर तो व्हायरल झाल्याने या फोटोबाबत सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com