आम्ही खचलो नाही; शुन्यातून उभे राहू : आमदार शशिकांत शिंदे  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

पक्षाच्या बैठकांना उपस्थित न राहणाऱ्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांना तातडीने बाजूला करून तेथे नव्याने तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊ. यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची पदे देताना पडत्या काळात पक्षासोबत राहणाऱ्यांचाच विचार केला जाईल. 

 शशिकांत शिंदे, आमदार 

सातारा  : सुडाचे राजकारण करून राष्ट्रवादी कॉंग्रेस मोडायचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. सत्तेचा चुकीचा वापर करून विरोधकांत भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. पण, आम्ही शरद पवारांशी बांधिल असून पुन्हा शून्यातून पक्षाची बांधणी करून राष्ट्रवादी उभी करू. त्यासाठी जिल्ह्यात येणारी शिवस्वराज्य यात्रा यशस्वी करण्यावर भर राहील, अशी माहिती राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद, आमदार शशिकांत शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही येत्या 28 ऑगस्टला जिल्ह्यात येत असून दुपारी दोन वाजता दहिवडीत सभा येईल. तेथून पुसेगाव, कोरेगावमार्गे साताऱ्यात येईल. येथे सायंकाळी पाच वाजता कल्याण रिसॉर्टला सभा व मुक्काम असेल. 29 ऑगस्टला सकाळी नऊ वाजता कऱ्हाडातील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन 11 वाजता कऱ्हाडात सभा होईल. दुपारी दोन वाजता पाटणला सभा घेऊन यात्रा कोकणाकडे मार्गस्थ होईल. यात्रेसोबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली. यात्रेच्या माध्यमातून राज्यात आणि देशातील भाजप सरकारच्या विरोधातील असंतोष मांडणार आहोत. रयतेच्या राज्यासाठी, रयतेच्या हक्कासाठी शिवस्वराज्य यात्रा हा एक नवा लढा उभारणार आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आम्ही यात्रेचे जोमात स्वागत करू, असे नमूद करून ते म्हणाले, ""केंद्रात आणि राज्यातील सत्तेत बदल होताना सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला साथ दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पराभूत व्हावेत, म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीने प्रचंड शक्तीचा वापर केला. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना पुन्हा निवडून दिले. सध्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपकडून नेते व कार्यकर्त्यांना विकासाचे स्वप्न दाखवून पक्षात घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला आत्मविश्‍वास ढळू देऊ नये. शिवस्वराज्य यात्रा यशस्वी करून यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जिल्हा शरद पवारांचे विचार मानतो, हे आपल्या एकजुटीतून दाखवून देऊ.'' 
शुक्रवारी (ता. 23) सकाळी दहा वाजता कवठे (ता. वाई) येथे व दुपारी दोन वाजता कोरेगाव बाजार समितीत यात्रेचा नियोजन मेळावा होईल. रविवारी (ता. 25) ऑगस्टला दुपारी चार वाजता दहिवडीत मेळावा होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. "ईडी'च्या चौकशीला आमचा विरोध नाही. पण, राजकीय सूडबुध्दीने भाजपकडून चुकीचा प्रकार सुरू आहे. सुडाच्या राजकारणातून राष्ट्रवादीला मोडायचे प्रयत्न भाजप करत आहे. सत्तेचा चुकीच्या पध्दतीने वापर करताना विविध चौकशींच्या माध्यमातून विरोधकांत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. जिल्हाध्यक्ष सुनील माने व सरचिटणीस राजकुमार पाटील यांनाही भाजपकडून ऑफर आली होती का, या प्रश्‍नावर आमदार शिंदे म्हणाले, ""भाजपकडून गेल्या तीन-चार वर्षांत राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदार व पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेशाची ऑफर येत आहे. पण, आम्ही त्यांच्या ऑफरकडे दुर्लक्ष करीत शरद पवारांच्या विचारांशी बांधिल राहात पक्षासोबतच राहिलो आहोत. विकासकामांच्या मुद्यावर काहींनी पक्ष सोडला. पण, आम्ही पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करू. पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's stand by zero : MLA Shashikant Shinde