इचलकरंजीतून पत्रसंपर्क थेट राणी एलिझाबेथ, क्लिंटन, बुश, मोदींशी... (व्हिडिओ) 

Letter writing to VIP
Letter writing to VIP

कोल्हापूर : स्मार्टफोनच्या जमान्यातील नव्या पिढीला पोस्टाने पत्र येणे म्हणजे काय, हे माहितही नसेल. पण, हळवी नाती जोडणारी ही पत्रे अनेक पिढ्यांनी आपल्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवली आहे. असे पत्रलेखन अजूनही नियमित करणारे आणि पत्राच्या माध्यमातून देशविदेशातील मान्यवरांशी संवाद साधणारे अवलिया इचलकरंजी शहरात आहेत. त्यांचे नाव मोहन चौगुले. गेली 38 वर्षे त्यांनी हा पत्रलेखनाचा छंद जोपासला आहे.

मोहन चौगुले यांनी १९८१ मध्ये पत्रलेखनास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ते मित्रांना शुभेच्छा पत्रे पाठवत होते. मित्रांचा मिळालेला प्रतिसाद बघून त्यांचा उत्साह वाढत गेला. त्यातून त्यानी सहकार, सामाजिक, संगीत, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतील लोकांना पत्र पाठवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांना मान्यवरांकडून उत्तरेही येऊ लागली. मग त्यांनी देश-परदेशात पत्रव्यवहार सुरू केला. वृत्तपत्रे, मासिके वाचनातून त्यांना विषय पत्रलेखनासाठी विविध विषय  मिळाले.


देश-विदेशातील नामांकित व्यक्तींना मोहन चौगुले यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, पदोन्नतीनिमित्त शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आणि त्याला प्रतिसादही मिळत गेला. पुरस्काराच्या निमित्ताने अभिनंदन, शुभ संदेश, शोक संदेश, परीक्षेतील यश अशा अनेक विषयावर त्यांनी दिग्गजांना पत्रे पाठवली. त्यातून त्यांचा हा पत्र प्रवास जगभर विस्तारत गेला.

आंतरराष्ट्रीय खेळाडू स्टेफी ग्राफ, अंतराळवीर सुनिता विल्यम, राणी एलिझाबेथ, जॉर्ज बुश, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संगीत क्षेत्रातील लता मंगेशकर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, नौशादजी, क्रीडा क्षेत्रातील कपिल देव, सचिन तेंडुलकर, साहित्यक्षेत्रातील पु. ल. देशपांडे, इंदिरा संत, वसंत बापट, शांता शेळके, गीरिजा कीर, सामाजिक क्षेत्रातील मदर तेरेसा, बाबा आमटे, राजकीय क्षेत्रातील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज बुश, भारताचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, ए. के. गुजराल, चंद्रशेखर, ज्येष्ठ नेते शरद पवार, देशातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा, चित्रपट सृष्टीतील अमिताभ बच्चन, जया बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र, हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन अशा अनेकांची पत्रे यांच्या संग्रही आहेत.

इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे संदेश वहनाचे साधनच बदलून गेले आहे. मात्र, अशा काळातही मोहन चौगुले यांनी जोपासलेला हा छंद माणसं आणि नाती जोडणारा ठरला आहे. 

कुराण भेट
हजरत सय्यद अब्दुल करीम यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यावेळी मोहन चौगुले यांनी 15 पैशाच्या पोस्ट कार्डवर त्यांना अभिनंदन पत्र पाठवले होते. त्याच्या प्रत्युत्तरादाखल त्यांनी मराठी अनुवादित कुराण चौगुले यांना भेट म्हणून पाठविले.

सहकुटुंब गौरव
केंद्रीय खत आणि रसायन मंत्री असताना सुरेश प्रभू यांनी मोहन चौगुले यांच्या कुटुंबियांना दिल्ली येथे बोलावले होते. त्यांच्या या उपक्रमाचा त्यांनी कौतुक करून पाठीवर थाप दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com