भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्य़ाचे वाचविले प्राण

satara
satara

कऱ्हाड : डोंगराच्या पायथ्याला भुकेने व्याकूळ होवून पडलेल्या बिबट्याला दहा तासांची धावपळ करून वन अधिकारी व प्राणी मित्रांनी जीवदान दिले. तालुक्यातील चोरजवाडी नजीक काल रात्री उशिरा घटना घडली. सायंकाळी सात वाजल्यापसून बिबट्याचे प्राण वाचावेत यासाठी वन विभाग व वन्यजीव प्रेमींची सुरू असलेली धडपड पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. अखेर बिबट्यावर उपचार करण्यात यश आल्याने त्याचे प्राण वाचले. उपचारासाठी बिबट्याला सुरक्षित स्थळी हलवले आहे. 

वन विभागासह वन्यजीव प्रेमींकडून मिळालेली माहितीनुसार, काल शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास दावरवाडी नजीकच्या जयवंत शुगर कारखाना आहे. तेथे चोरजवाडीच्या नजीक डोंगर पायथ्याला बिबट्या ओढ्याच्या काठावर भुकेने व्याकूळ होवून तडफडत आहे, याची एका सुज्ञ गुराख्याने वन विभागास दिली. त्यावेळी वन क्षेत्रपाल डॉ. अजीत साजणे यांनी बीट गार्डला तात्काळ तेथे घटनास्थळी जाण्यास सांगितले. संबधित गार्ड घटनास्थळी पोचल्यावर त्यांना डोंगर पायथ्याला ओढ्यालगत बिबट्या भुकेने व्याकूळ होवून तडफडताना दिसला. तो जमिनीवर पडला होता. त्याच अवस्थेत अधूनमधून डरकळी फोडत होता.
 
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी पुन्हा डॉ. साजणे माहिती दिली. तोपर्यंत रात्रीच्या साधारणपणे सव्वा नऊ वाजले होते. त्यातच पाऊस होता. घटनास्थळी पोहोचण्यास अडचण निर्माण होत होती. तडफडत पडलेल्या बिबट्याच्या जीवाचा प्रश्न असल्याने वन विभागाने पळापळ करून पशू वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उपलब्ध होतात का, याची माहिती घेत स्वतः घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याचवेळी त्यांनी वन्य जीव प्रेमी रोहन भाटे यांच्याशी संपर्क साधला. भाटे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली.

वनक्षेत्रपाल यांच्यासह प्राणीमित्र रात्री अकराच्या सुमारास पोचले. तोपर्यंत तेथे वनविभागाचे अन्य कर्मचारी दाखल झाले होते. सातारा येथील मोबाईल स्कॉडचे वनक्षेत्रपाल संदीप गवारे यांना ही घटनास्थळी बोलावून घेतले होते. उपलब्ध सुविधेच्या आधारे घटनास्थळावरच तडफडणाऱ्या बिबट्यावर प्राथमिक उपचार करून वनविभागाचे अधिकारी व प्राणीमित्रांनी बिबट्याला पुढील उपचारासाठी सुरक्षित स्थळी हलवले. बिबट्याच्या अंगात पुरेसा त्राण राहिला नसल्याने त्याला पकडणे सहज शक्य झाले. उपचारास बिबट्याने चांगला प्रतिसाद दिला. त्याला खाण्यासाठी ताजे चिकन देण्यात आले. त्यालाही बिबट्याने प्रतिसाद देऊन बिबट्याची हालचाल वाढली. साधारणपणे सात वाजल्यापासून पहाटे तीनपर्यंत बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व प्राणिमित्रांची धडपड सुरू होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. बिबट्याला वाचविण्यासाठी सुमारे दहा तास राबविलेल्या मोहिमेत सातारा येथील पशुवैद्यकीय अधिकारी, वन क्षेत्रपाल अजित साजने, प्राणीमित्र रोहन भाटे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

चौकट 

व्याकूळ होवून पडलेला बिबट्या नर आहे. त्याचे अंदाजे वय दोन वर्षाचे आहे. त्याला दोन दिवसांपासून खायला काहीच उपलब्ध जाले नसावे, म्हणून तो व्याकूळ होवून पडला होता. चोरजवाडीच्या डोंगरासह पलिकडे जंलही आहे. त्यामुळे त्याच जंगलात त्याचा वावार शक्या आहे, असा अंदाज प्राणी मित्र रोहन भाटे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com