धर्मराज काडादी गोळीबार : चौघांना सक्तमजुरी 

Life imprisonment for four in Dharmaraj Kadadi firing in Solapur
Life imprisonment for four in Dharmaraj Kadadi firing in Solapur

सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यावरील गोळीबारप्रकरणी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी माजी संचालक महांतेश पाटीलसह चौघांना आरोपींना आठ वर्षे सक्तमजुरी, चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

तत्कालीन संचालक महांतेश पाटील (वय 45, रा. जेऊर ता. अक्कलकोट), शरणप्पा ऊर्फ शरणप्पा शिवानंद दिंडोरे (वय 29), शिवराया पंडीत बाके (वय 27) आणि चंद्रकांत ऊर्फ चिन्नू रामचंद्र माळी-हेळतोट (वय 27, तिघे रा. आहेरवाडी ता. दक्षिण सोलापूर) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष काडादी हे 30 जून 2012 रात्री 7.50 च्या सुमारास सिद्धेश्‍वर कारखान्यापासून सोलापूर शहराकडे येत होते. हत्तुरे वस्ती येथे त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. यात काडादी हे बालंबाल बचावले होते.

कारखान्याचा तत्कालीन संचालक असलेला आरोपी महांतेश पाटील हा दारू पिऊन कारखान्याच्या मीटिंगला येत असल्याची तक्रार कारखान्याचे अध्यक्ष काडादी यांनी आरोपीचे चुलते माजी आमदार महादेव पाटील यांच्याकडे केली होती.

आरोपी महांतेश पाटील याने कारखान्याच्या पेट्रोल पंपावर जाऊन वाद घातला होता. या कारणावरून महादेव पाटील यांनी महांतेश पाटील यास रागावून घराबाहेर काढले होते. त्यामुळे आरोपी महांतेश पाटील हा धर्मराज काडादी यांच्यावर चिडून होता. त्याने आपले साथीदार बप्पू ऊर्फ शरणप्पा दिंडोरे, शिवराया बाके आणि चंद्रकांत माळी यांच्याशी संगनमत करून धर्मराज काडादी यांच्या खुनाचा कट रचला.

त्यानुसार आरोपी बप्पू दिंडोरे व आरोपी चंद्रकांत माळी यांनी दुचाकीवर येऊन काडादी यांच्या कारवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या. 

या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारपक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने गेल्या आठवड्यात सर्व आरोपींना दोषी धरले होते. शिक्षेवरील सुनावणी सोमवारी झाली.

न्यायालयाने महांतेशसह चौघांना आठ वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे आनंद कुर्डूकर, मूळ फिर्यादी धर्मराज काडादी यांच्यातर्फे ऍड. जयदीप माने तर आरोपींतर्फे ऍड. एम. एन. देवडकर, ऍड. एम. जी. थोरात यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com