पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला 20 वर्षांची जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सचिन मधुकर डोके (वय 36, रा. इंचगाव, ता. मोहोळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सचिनचे परिसरातील महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती पत्नी ज्योती यांना समजली होती.

सोलापूर : अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पत्नीशी भांडण काढून तिच्या डोक्‍यात लोखंडी ठोंब्याने मारून तसेच तिला भिंतीवर ढकलून देऊन खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी 20 वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

सचिन मधुकर डोके (वय 36, रा. इंचगाव, ता. मोहोळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सचिनचे परिसरातील महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती पत्नी ज्योती यांना समजली होती. यामुळे आरोपी सचिनने ज्योती यांना लोखंडी ठोंब्याने डोक्‍यात मारून जखमी केले. नंतर भिंतीवर ढकलून दिले. यात ज्योती यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ज्योती यांच्या आई लक्ष्मी गोरे यांनी फिर्याद दिली होती. तर आरोपीची पाच वर्षांची मुलगी शिवानी हिने न्यायालयास वडिलांनीच आई ज्योती हिला मारहाण केल्याची माहिती सांगितली होती. यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सचिन यास 20 वर्षे जन्मठेप आणि पाच लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दंडाच्या रकमेतील पाच लाख फिर्यादी लक्ष्मी गोरे व आरोपीच्या अज्ञात चार मुलांमध्ये समान स्वरूपात अदा करण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यातील महिला आरोपी मनीषा सुरवसे हिला निर्दोष सोडण्यात आले आहे. या खटल्यात सरकारतर्फे ऍड. वामनराव कुलकर्णी तर आरोपीतर्फे ऍड. आय. एल. शेख व आरोपी मनीषा सुरवसेतर्फे ऍड. एम. ए. इनामदार यांनी काम पाहिले.

Web Title: life imprisonment in murder case