खंडणीसाठी मित्राचा खून करणाऱ्यांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

श्रीरामपूर : एक कोटीच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणाचे मित्रांनी अपहरण करून त्याचा खुन करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. पाटील यांनी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

श्रीरामपूर : एक कोटीच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणाचे मित्रांनी अपहरण करून त्याचा खुन करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. पाटील यांनी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबतची अधिक माहिती अशी, चासनळी (ता. कोपरगाव) येथील गणेश गोरक्षनाथ चांदगुडे हा त्याचे मामा सुनील सिताराम दौंड (रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. येथील बोरावके महाविद्यालयात तो बारावीचे शिक्षण घेत होता. १२ मार्च २०१५ रोजी गणेश याने मित्र पराग याच्या घरी सीईटीचा अभ्यास करण्यासाठी जातो, असे सांगून घरातून गेला होता. मात्र, तो पुन्हा घरी परतला नाही. या दिवशी त्याचे मित्र अजय दिनकर मोरे, पराग मच्छिंद्र पटारे व धीरज शंकर शिंदे या तिघांनी त्याला पळवून नेले. त्यानंतर त्याच्या आईच्या मोबाइलवर मेसेज व संपर्क साधून एक कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली होती. 

यानंतर आरोपींनी गणेश याला नेवासा फाटा येथे दारू पाजून नगर-औरंगाबाद रस्त्याने गंगापूर हद्दीत नेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड टाकून पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकाऱ्यांनी तपास करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण २६ साक्षीदार तपासण्यात आले. 

हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. घटना पाहाणारा कुणीही साक्षीदार नव्हता. मयताच्या आईच्या मोबाईलवर आलेले मेसेज व मयताकडे असलेल्या मोबाइलच्या आयइएमआय क्रमांकावरून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. सरकारी वकील भानुदास तांबे यांनी परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी जुळवली. मोबाइलच्या मेसेजेसची फॉरेन्सिक लॅबमध्ये बनविण्यात आलेली सीडी न्यायालयापुढे दाखविण्यात येवून मेसेज वाचण्यात आले, हे सर्व  न्यायालयाने पुरावे म्हणून मान्य केले. 

या गुन्ह्यात वरील तिघा आरोपींना भादंवि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी पाच हजारांचा दंड, कलम ३६३ अन्वये एक वर्ष कैद, ३६४ (अ) अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, कलम ३८५ अन्वये सहा महिने शिक्षा व ५०० रुपये दंड, कलम ३८७ व ३४ अन्वये तीन वर्षे सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिने शिक्षा, कलम १२० ब अन्वये तीन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी, कलम २०१ अन्वये तीन वर्षे शिक्षा व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपींनी एकाच वेळी भोगावयच्या असून दंडाच्या रकमेपैकी १० हजार रुपये मयताची आई मिनाक्षी चांदगुडे यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: Life imprisonment for murder in Shrirampur