कोल्हापूर - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मे 2019

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य (लैंगिक अत्याचार) केल्याप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला काल जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कोल्हापूर - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य (लैंगिक अत्याचार) केल्याप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला काल जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चांदणे हा कोल्हापुरातील एका गाजलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून खटल्यातील आरोपी असून, याप्रकरणी त्याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार चांदणेला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा ही राज्यातील अलीकडच्या काळातील मोठी शिक्षा आहे.

दरम्यान जानेवारी २०१३ मध्ये याबाबतचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. शहर परिसरातील एका शाळकरी मुलाचे २५ डिसेंबर २०१२ ला अपहरण झाले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह जवळच्याच एका शेतातील विहिरीत सापडला होता. तपासादरम्यान याच परिसरात राहणाऱ्या चांदणे याने ‘त्या’ अल्पवयीन मुलाचा खून केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याला अटक करून केलेल्या तपासादरम्यान चांदणे याने एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचे समोर आले होते. सुटीच्या दिवसात पीडित मुलगा घरात एकटा असल्याचे पाहून चांदणे याने हे कृत्य केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर १६ जानेवारी २०१३ ला चांदणे याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांच्यासमोर पूर्ण झाली. ॲड. सुजाता इंगळे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. 

या कामी ॲड. इंगळे यांनी सहा साक्षीदार तपासले. यातील पीडित मुलासह तपास अधिकारी इंद्रजित सोनकांबळे व पोलिस कर्मचारी कृष्णात बोडगे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने चांदणे याला बाल लैंगिक अत्याचार  प्रतिबंधात्मक कायद्यातील विविध कलमांन्वये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

दुसऱ्यांदा जन्मठेप 
खूनप्रकरणी अटक झाल्यानंतर तपासात समोर आलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी चांदणेवर गुन्हा दाखल झाला होता. या दोन्ही खटल्यांची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. खून प्रकरणात या आधीच न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली आहे. आज बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील खटल्यातही त्याला जन्मठेप दिली. या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.

Web Title: Life imprisonment for unnatural offender