लाइफलाइन स्वरांची

सुधाकर काशीद
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

कोल्हापूर - दिपू खेळताना पडला होता. डोक्‍याला मार बसल्याने अर्धवट ग्लानीतच होता. डॉक्‍टर जरूर त्यांच्यापरीने उपचार करत होते. दिपूच्या आई-वडिलांना कोणी तरी सांगितले, की याच्यावर म्युझिक थेरपीचा उपचार करून पाहा. आई-वडील सचिन सरांकडे आले. त्यांनी दिपूची अवस्था सांगितली. हे सांगताना सचिन सरांच्या लक्षात आले, की दिपूला शाळेतल्या कामत बाईंचे कविता शिकवणे व चाल लावून कविता म्हणणे खूप आवडायचे. मग सचिन सर कामत बाईंच्याकडे गेले. त्यांना घेऊन ते रेकॉर्डिंग स्टुडिओत आले.

कोल्हापूर - दिपू खेळताना पडला होता. डोक्‍याला मार बसल्याने अर्धवट ग्लानीतच होता. डॉक्‍टर जरूर त्यांच्यापरीने उपचार करत होते. दिपूच्या आई-वडिलांना कोणी तरी सांगितले, की याच्यावर म्युझिक थेरपीचा उपचार करून पाहा. आई-वडील सचिन सरांकडे आले. त्यांनी दिपूची अवस्था सांगितली. हे सांगताना सचिन सरांच्या लक्षात आले, की दिपूला शाळेतल्या कामत बाईंचे कविता शिकवणे व चाल लावून कविता म्हणणे खूप आवडायचे. मग सचिन सर कामत बाईंच्याकडे गेले. त्यांना घेऊन ते रेकॉर्डिंग स्टुडिओत आले. बाईंनी त्यांच्या आवाजात ‘फूलपाखरू, किती छान दिसते’ ही कविता रेकॉर्ड केली आणि दिपूच्या कानाला हेडफोन लावून ती कविता पाच- सहा वेळा ऐकवली. एक क्षण असा आला, की ग्लानीत असलेला दिपू हळूहळू ओठ हलवू लागला, हसू लागला. कविता ऐकल्यामुळे दिपू पूर्ण बरा झाला नव्हता; पण त्याच्यातील बदल खूप आशावादी होत होता.

म्युझिक थेरपीच्या आधारे एक सेवा म्हणून उपचार देणारे सचिन जगताप हे बासरीवादक आहेत. बासरीवादनात देशभरात त्यांचा एक लौकिक होत आहे; पण आजारी माणसाला जर योग्य संगीत ऐकवले तर जरूर त्याच्यात चांगला फरक पडू शकतो. म्हणून ते रुग्णांना हेडफोनच्या आधारे संगीत ऐकवतात. या उपचारानेच रुग्ण पूर्ण बरे होतात, असा त्यांचा दावा नाही; पण या उपचाराने रुग्णात थोडेफार तरी चैतन्य येऊ शकते असा त्यांचा अनुभव आहे. आजवर पन्नास रुग्णांना त्यांनी स्वखर्चाने ही मोफत सेवा दिली आहे.

राजारामपुरीतल्या श्रीनाथ या पाणी पुरविणाऱ्याला अपघातामुळे डोक्‍यास मार लागला होता. त्याचा रक्तदाब कमी होत होता. डॉक्‍टरांचे उपचार सुरूच होते; पण डॉक्‍टरांच्या त्या उपचाराला पर्याय म्हणून नव्हे तर या उपचारासोबतच त्यांनी श्रीनाथला तो राजस्थानचा म्हणून हेडफोनच्या साहाय्याने राजस्थानी संगीत पाच-सहा वेळा ऐकवले. त्याच्या हालचालीत बदल होत गेला. केवळ या संगीत ऐकवण्यामुळे शंभर टक्के नाही; पण औषधोपचाराबरोबर त्याचे आवडते संगीत कानावर पडल्यामुळे निश्‍चित रुग्णात थोडेफार चैतन्य येऊ शकते, असे सचिन जगताप यांचे म्हणणे आहे.
ते म्हणाले, ‘‘केवळ संगीतच असे नाही तर ग्लानीत किंवा कोमात असलेल्या रुग्णांना इतरांपेक्षा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज कानावर पडला तर त्याची थोडीफार हालचाल होते. डोळ्यांची थोडी उघडझाप होते. काही जणांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात; पण ते उठू शकत नाहीत. काही बोलू शकत नाहीत. पण अशा व्यक्तींच्या कानावर संगीत, त्या व्यक्तीला आवडत असलेले गाणे, त्या व्यक्तीला परिचित असलेल्याचा आवाज वारंवार कानावर पडत राहिला तर त्यांच्यात निश्‍चित थोडेफार चैतन्य येऊ शकते.’

मी हा उपचार मोफत करतो. आधुनिक वैद्यकशास्त्राला पूरक असा हा उपचार आहे. संगीत ऐकल्यामुळे कोमातला रुग्ण शुद्धीवर आला, असा माझा दावा नाही; पण संगीत ऐकवलं तर कोमातल्या रुग्णात थोडंफार चैतन्य येऊ शकतं, हा माझा अनुभव आहे.
- प्रा. सचिन जगताप

मूळ औषधोपचार सुरू ठेवून जोडीला म्युझिक थेरपी दिली तर काही बदल जाणवू शकतात; पण ठाम दावा करता येत नाही. त्यासाठी समान लक्षणे असलेल्या एका रुग्णाला औषधांबरोबर म्युझिक थेरपी व दुसऱ्याला फक्त मूळ औषधोपचार देऊन त्यांच्यातील बदल नोंदवले गेले पाहिजेत. अर्थात म्युझिक थेरपीचा प्रयत्न पूरक उपचार म्हणून चांगला आहे. ही थेरपी पूर्ण उपचार पद्धती नाही.
-  डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, मेंदूविकारतज्ज्ञ

Web Title: lifeline music theropy