स्मशानभूमीच्या जागेसाठी लिंगायत समाजाचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पाथर्डी : वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर पालिकेने टाकलेले बागेचे आरक्षण तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी आज नागरिकांनी आंदोलन केले. या विषयावर सुनावणी घेण्यासाठी आलेल्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी पालिका कार्यालय दणाणून सोडले.

पाथर्डी : वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर पालिकेने टाकलेले बागेचे आरक्षण तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी आज नागरिकांनी आंदोलन केले. या विषयावर सुनावणी घेण्यासाठी आलेल्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी पालिका कार्यालय दणाणून सोडले.

पालिका हद्दीत सिटी सर्व्हे क्रमांक 327 मध्ये लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे. पालिका प्रशासन व नगररचना विभागाने यापूर्वी पालिका हद्दीत असलेल्या सर्व्हे क्रमांक 337वर प्रस्तावित असलेले बागेचे आरक्षण काढून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर टाकल्याने नागरिक संतप्त झाले. समाजाचे कार्यकर्ते मनसेचे तालुकाप्रमुख संतोष जिरेसाळ, सोमनाथ जिरेसाळ, मनसेचे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, शिवा कराड, प्रसाद फुटाणे, नीलेश फुटाणे, सदाशिव कऱ्हाडकर, संतोष बुरसे, बाळासाहेब बुरसे यांनी या विषयावर सुनावणी घेण्यासाठी आलेल्या नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, नगररचनाकार किशोर पाटील, सहायक रचनाकार संदीप जोशी यांच्यासमोर घोषणाबाजी करीत आपले म्हणणे सादर केले.

या वेळी बोलताना संतोष जिरेसाळ म्हणाले, "पूर्वी ज्या जागेवर बागेचे आरक्षण होते, ती जागा कोट्यवधी रुपयांना काही ठेकेदारांनी घेतली आहे. या जागेवर असलेले आरक्षण लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर टाकल्याने, अंत्यसंस्कार कोठे करायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हे आरक्षण न हटविल्यास पालिका कार्यालयासमोर असलेल्या जागेत आम्ही लिंगायत समाजाच्या प्रथेप्रमाणे मृत व्यक्तीचे दफन करू. वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू.'' 
प्रतिभा भदाणे यांनी पाहणी करून शासनाला अहवाल देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Lingayat community agitation for for graveyard land