लिंगनूर तलावातील पाणी लुटीला दणका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

सांगली - लिंगनूर (ता. मिरज) येथील एमआय तलावातून होत असलेल्या बेकायदेशीर पाणी लुटीला पाटबंधारे विभागाने दणका दिला आहे. तलावातून पाणी उपशासाठी बसवण्यात आलेल्या विद्युत पंपांची चौकशी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंतराव गुणाले यांनी दिले आहेत. तलावाच्या कालव्यावरील सामान्यांनी छेडलेल्या या लढाईचे नेतृत्व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी हाती घेतले आहे.

माहिती अधिकार कायद्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लिंगनूर तलावाची पाणीसाठा क्षमता ८७ दशलक्ष घनफूट इतकी आहे. पैकी १७ दशलक्ष घनफूट मृतसंचय आहे. तलावावर कालवा असून पाणी वापर कायद्यानुसार ६ टक्के पाणीच थेट तलावातून पंपाने उचलता येते. या परिसरात अनेक बड्या लोकांनी शेतजमिनी खरेदी केल्या आहेत. त्यात द्राक्ष, आंब्यासह बागा पिकवल्या आहेत. त्यासाठी थेट कालव्यावर पाच ते पंधरा अश्‍वशक्तीचे पंप बसवण्यात आले आहेत. तलावातून बहुतांश पाणी ही मंडळीच उचलत असून स्थानिक हतबल झालेत. त्यापैकीच काहींनी माहिती अधिकार कायद्यातून तलावाविषयी संपूर्ण माहिती हाती घेऊन लढण्याचे  ठरवले. त्यांचे नेतृत्व डॉ. पाटणकर यांनी हाती घेतले. त्याची पहिली बैठक पाटबंधारे विभागात अधीक्षक अभियंता श्री. गुणाले यांच्यासोबत झाली. डॉ. पाटणकर यांनी तलावातील पाणी लुटले जात असल्याचे  पुराव्यानिशी सिद्ध केल्यानंतर त्याविरुद्ध चौकशीचे  आदेश देण्यात आले. 

डॉ. पाटणकर यांनी कायद्यातील तरतुदींच्या आधारे पाटबंधारे विभागाने या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली. या तलावातून बंदीनंतरही पाणी उपसा केला तर उपसा करणाऱ्यांनी म्हैसाळ योजनेकडून पाणी विकत घेऊन स्थानिक कालव्यावरील शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

९४ विद्युत पंप, शेकडो एकर क्षेत्र
महावितरणकडून माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार, लिंगनूर कालव्यावर ९४ विद्युत पंप कनेक्‍शन देण्यात आले आहेत. त्यातून दिवसरात्र उपसा सुरू असतो. शेकडो एकर बागायती क्षेत्र असून सामान्य शेतकऱ्यांची शेती उन्हाळ्यात वाळून जाण्याची भीती असते. त्यामुळेच स्थानिकांनी आवाज उठवला.

Web Title: Lingnur Lake Water Loot