कोल्हापूर: 150 मद्य दुकानांवर टांगती तलवार

राजेश मोरे
शनिवार, 17 डिसेंबर 2016

महामार्गावरील मद्य दुकानांवर कारवाईबाबतचे आदेश विभागाला प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार अंमलबाजवणी केली जाईल.
संजय पाटील (उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग).

कोल्हापूर - महामार्गावरील मद्यविक्री बंदीची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सुमारे 140 ते 150 मद्याची दुकाने बंद होण्याची शक्‍यता आहे. महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असणाऱ्या मद्य दुकानदारांवर याची टांगती तलवार राहणार आहे. आदेश प्राप्त झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई केली जाणार आहे.

देशातील रस्ते अपघातात दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, अशी आकडेवारी समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देशातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मद्याच्या दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश दिला. महामार्गावर सुरू असणाऱ्या मद्य दुकानांच्या परवान्यांचे 31 मार्च 2017 नंतर नूतनीकरण करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे महामार्गावरील मद्य दुकानदार हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात आज परमिट रूम, बीअर शॉपी, कंट्री लिकर, दारू दुकानांची संख्या 1365 इतकी आहे. त्यांतील सुमारे 140 ते 150 मद्य दुकाने या आदेशाच्या कात्रीत सापडणार आहेत. सध्याच्या एकूण संख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांहून अधिक आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत.

राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 75 मीटर अंतरावर मद्य दुकानांना परवानगी देते. गावठाण हद्दीतून गेलेल्या महामार्गाच्या ठिकाणी परवानगीसाठी कोणतेही नियम लावण्यात आलेले नाहीत. ईझी टू बिझनेस अंतर्गत आता परमिट रूमसाठी हॉटेलचा स्वतंत्र परवाना घेण्याची सक्ती शासनाने रद्द केली आहे. केवळ राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या परवान्यानंतर परमिट रूमचा परवाना उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे महामार्गावरील अशा परमिटची संख्या गेल्या काही महिन्यांत झपाट्याने वाढली आहे. सध्या राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्ह्यातून 176 कोटींचा महसूल गोळा करते. त्यांना यावर्षी 210 कोटींचे टार्गेट दिले आहे. महामार्गावरील मद्य दुकाने बंद करण्याची अंमलबजावणी झाल्यास शासनाचा 15 ते 20 कोटींचा महसूल बुडण्याचा धोका आहे; मात्र त्याच तुलनेत अपघाताचे प्रमाणही घटण्यास मदत होईल, असे अभ्यासकांचे मत आहे.

जिल्ह्यातील मद्य दुकानांची स्थिती
स्वरूप संख्या

परमिट रूम - 680
बीअर शॉपी - 355
कंट्री लिकर - 285
वाईन शॉपी - 45

महसुलाची रक्कम
स्वरूप वार्षिक महसूल ग्रामीण शहरी भाग
परमिट रूम 50 हजार चार लाख
बीअर शॉपी 15 हजार लोकसंख्येवर
कंट्री लिकर 35 हजार लोकसंख्येवर
वाईन शॉपी 3 लाख लोकसंख्येवर

Web Title: liquor ban in kolhapur district