दारूपायी निष्पापांना अनाथपणाचा भोग...

प्रशांत गुजर
मंगळवार, 9 एप्रिल 2019

खुलेआम दारूविक्री...  
आनेवाडी परिसरात सध्या दारूविक्री राजरोसपणे सुरू आहे. ती रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. जावळी तालुक्‍यात ज्या आनेवाडीत सर्वप्रथम दारूबंदी झाली. त्याच आनेवाडीत अवैध दारू विक्रीमुळे संसार उद्‌ध्वस्त होऊ लागले आहेत. त्यामुळे भुईंज पोलिस ठाण्याला रुजू झालेले पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा अवैध दारू विक्रीचे आव्हान कशा पद्धतीने हाताळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सायगाव - जावळी तालुक्‍यात महिलांनी उभ्या केलेल्या दारूबंदी चळवळीमध्ये आनेवाडीत सर्वप्रथम मतदानाद्वारे दारूबंदी करून महिलांनी इतिहास घडविला. त्याच आनेवाडीत दारूपायी पत्नीने केलेल्या पतीच्या खुनाने मात्र एक कुटुंब उद्‌ध्वस्त झाले तर ज्यांचा यामध्ये काहीही संबंध नव्हता, अशा खेळत्या निष्पापांच्या पदरी मात्र अनाथाचा भोग आला आहे.  

येथील संजय कांबळे, पत्नी सुलोचना या चार मुलांसह सासरवाडी असलेल्या आनेवाडीत राहत होता. मोटार वायंडिंगची कला असल्याने त्याच्याकडे कामाचीही कमतरता नव्हती. वाईच्या खासगी दुकानात काम करत असतानाच त्याला दारूचे व्यसन जडले. त्यामुळे हातात पैसा राहत नव्हता. रोजच्या पिण्याच्या नादात खाण्याचे मात्र वांदे होऊ लागले. 

त्यामुळे पती-पत्नीमध्ये कायम खटके उडायचे. कधी कधी तर लहान मुलांसह सर्व कुटुंब उपाशी झोपायचे. पैसा नसल्याने कधी शाळेचीही पायरी न चढू शकलेली मुले, पत्नी देखील उपाशी राहू, पण मागून खाणार नाही, या स्वभावाची होती. या गोष्टींचा पत्नी सुलोचनाच्या मनावर परिणाम होत राहिल्याने ती मानसिक रुग्ण झाली. त्या स्थितीतही ती मुलांचा कसाबसा सांभाळ करत होती. परंतु, पतीच्या वागण्यात काहीही बदल होत नसल्याने तिने पतीचा डोक्‍यात फरशी व वरवंटा घालून शेवट केला. 

पण, नियती भविष्यात पुढे काय मांडणार? हे तिच्या ध्यानी आलेच नाही. मुलांचे काय होईल, याचासुद्धा विचार तिच्या डोक्‍यापर्यंत पोचला नाही.

संपूर्ण प्रकारात दारूने जन्मदात्या वडिलांना देवाघरी नेले. तर आई कारागृहात गेली. आता श्रेया, पूर्वा, सायली आणि राहुल ही निष्पाप मुलं नियतीच्या खेळात अनाथाचे भोग भोगू लागली आहेत. प्रेमाची, मायेची माणसं देखील त्यांच्यापासून दुरावली आहेत. 

संजयच्या वाकुर्डे (जि. सांगली) येथील नातेवाईकांनी देखील मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिला असून त्यांनी संजयच्या मृतदेहाला अग्नी देवून मुलांची जबाबदारी झटकली आहे. तर सुलोचनाच्या माहेरी देखील कोणी जबाबदार व्यक्‍ती नसल्याने मुलांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. 

या मुलांचा सांभाळ करण्यास कोणीच पुढे येत नसल्याने पोलिसांना देखील नाईलाजास्तव या मुलांना रिमांड होममध्ये पाठवावे लागले. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, त्या वयात या मुलांना पोलिस ठाणे, कोर्ट, रिमांड होमच्या पायऱ्या चढाव्या लागणार असल्याने समाजातील दानशूर व्यक्‍ती, सामाजिक संस्थांनी त्यांच्या भवितव्यासाठी पुढे येणे गरजेचे बनले आहे.

ज्या वयात खेळायचे, त्या वयात या मुलांवर अशी वेळ यायला नको होती. त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घरातील कोणत्याही व्यक्‍तीने उचलली तर आम्ही त्यासाठी सर्वतोपरी मदत करू.
- विजय पोरे, सामाजिक कार्यकर्ते, वाई

Web Title: Liquor Orphaned Child Police