सातारानजीक रुग्णवाहिकेतून लाखाची दारु पकडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

बेकायदेशीरपणे देशी- विदेशी दारू वाहतूक करणारी रुग्णवाहिका सायगाव ग्रामस्थांनी पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिली

सातारा : बेकायदेशीरपणे देशी- विदेशी दारू वाहतूक करणारी रुग्णवाहिका सायगाव ग्रामस्थांनी पकडून त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जावून रुग्णवाहिकेसह अवैध दारूचा एक लाख 92 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती मेढा पोलिसांनी दिली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास रुग्णवाहिका (क्रमांक एमएच 11 एच 6969) सायगावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या रस्त्यावर आली असता काही ग्रामस्थांनी संशय म्हणून ती थांबवली. त्यामध्ये 92 हजार 754 रुपये किंमतीची देशी- विदेशी दारु निदर्शनास आली.

त्यानंतर मेढा पोलिसांना फोनवरुन माहिती देण्यात आली. त्यानुसार सहायक फौजदार संजय राजेशिर्के व जितेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी जावून रुग्णवाहिकेसह सर्व मुद्देमाल ताब्यात घेतली.

या प्रकरणी सातारा येथील विजय देशमुख व संतोष पवार यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली. या प्रकरणी त्यांना पोलिस कोठडी मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक श्री. चामे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: llegal alcohol was caught from the ambulance near satara