कर्जाला कंटाळून सख्ख्या भावांची आत्महत्या 

कर्जाला कंटाळून सख्ख्या भावांची आत्महत्या 

कऱ्हाड - शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केली. जगन्नाथ कृष्णा चव्हाण (वय 41) व विजय कृष्णा चव्हाण (33) अशी त्यांची नावे आहेत. विजयने ओगलेवाडी येथील त्याच्या दुकानात विष प्यायले. त्याची माहिती समजताच मोठा भाऊ जगन्नाथने टेंभू फाट्यावर रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. काल रात्री आठनंतर अवघ्या तासाभराच्या अंतराने या हृदयद्रावक घटना घडल्या. त्यांच्या मागे बॅंकांच्या कर्ज परतफेडीचा तगादा लागला होता. त्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पोलिसांनी सांगितले, की विजय व जगन्नाथ यांचे वडगाव हवेली हे मूळ गाव आहे. विजय सैदापूर येथे राहात होते. त्यांचे ओगलेवाडी येथे सम्राट कृषी सेवा केंद्र हे खताचे दुकान आहे. विजय काही दिवसांपासून तणावाखाली होते. काल रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी त्याच्या दुकानातच विषारी औषध प्यायले. त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांचा मोठा भाऊ जगन्नाथ यांना फोनवरून ही माहिती देण्यात आली. त्या वेळी जगन्नाथ कडेगावहून वडगाव हवेलीकडे चालले होते. त्यांनी तेथूनच शेजारील रेल्वे मार्गावर टेंभू फाटा येथे जाऊन कोल्हापूरहून मुंबईकडे चाललेल्या रेल्वेखाली आत्महत्या केली. दोन्ही भावांकडे बॅंकांची कर्जे होती. त्याची परतफेड करण्यासाठी बॅंकांचा तगादा होता. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. वास्तविक दोघेही प्रगतशील शेतकरी होते. चार वर्षांपूर्वी जगन्नाथने शेतीपूरक व्यवसायाचा जे. पी. ऍग्रो नावाचा कारखाना कडेगाव येथील एमआयडीसी येथे सुरू केला होता. तेथे सरकी पेंडची निर्मिती केली जायची. जगन्नाथ शेतीही करायचे. मात्र, कर्जांमुळे दोघेही भाऊ मानसिक तणावाखाली होते. 

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 
रात्री उत्तरीय तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतले नाहीत. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक रात्रीपासून बसले होते. जिल्हा परिषदचे माजी सदस्य बंडानाना जगताप, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सकाळी त्यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी शासनाकडून दोघांच्या कर्जाच्या वसुलीची चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्याबाबत प्रांताधिकारी पवार यांना कळविण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रांताधिकारी पवार यांनी तेथे भेट दिली. कर्जाबाबत सविस्तर चौकशी करून त्याचा योग्य अहवाल पाठवला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. दुपारी एकच्या सुमारास मृतदेहावर वडगाव हवेली येथे अंत्यसंस्कार झाले. विजय व जगन्नाथ यांचे चुलत बंधू अशोक दिनकर चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की दोघांच्या कर्जाची चौकशी होऊन ती माफ करावीत. त्या दोघांनी यशवंत सहकारी बॅंक व कऱ्हाड अर्बन बॅंकेची कर्जे घेतली आहेत. त्याचा आकडा तीस लाख आहे. ती 17 ऑक्‍टोबर 2014 रोजी काढली आहेत. त्यातील काही रक्कम भरलेली आहे. मात्र शेती व शेतीपूरक व्यवसायात तोटा झाल्याने त्या कर्जाची परतफेड करता आलेली नाही. दोन्ही बॅंकांचे वसुलीसाठी तगादे चालू होते. नोटिसा येत होत्या. 

25 लाखाला गंडा..? 
विजय व जगन्नाथ यांच्यावर बॅंकाचे कर्ज होते. त्याशिवाय एका व्यावसायिक बॅंकेकडून कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्या दोघांना सुमारे 25 लाख रुपयांना परप्रांतीय लोकांनी गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. सुमोत, मांजे व आचार्य अशी त्यांची नावे आहेत. संबंधित तिघेही त्या बॅंकेत नोकरीस असल्याचे पोलिसांना समजले आहे. ते जगन्नाथ यांना पाच कोटींचे कर्ज देणार होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याबाबत चौकशी सुरू आहे. 

पोलिसांची मनेही हेलावली 
जगन्नाथने कोल्हापूरहून मुंबईकडे चाललेल्या रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांच्या शरीराचे तुकडे झाले होते. घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिस तेथे पोचले. त्यावेळी जगन्नाथचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडला होता. त्याची दुचाकी व मोबईल तेथे पडलेला सापडला. त्यावरून त्याची ओळख पटली. शरीराचे तुकडे गोळा करावे लागले. त्या वेळी पोलिसांचीही मने हेलावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com