गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

कोल्हापूर - सरसकट कर्जमाफी केली तर मोठ्या शेतकऱ्यांनाच याचा जास्त लाभ मिळेल. त्यामुळे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांनाच कर्जमाफी द्यावी लागेल. गावनिहाय कर्जदार शेतकऱ्यांची यादी तयार करून जे शेतकऱ्यांच्या नावावर क्षमतेपेक्षा जास्त कर्ज असल्याने त्याची परतफेड होऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा स्वार्थासाठी आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांचे आहे, आम्हाला शेतीतील काही कळत नाही असे कोणी समजू नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, पण सरसकट कर्जमाफी दिली तर राज्याच्या तिजोरीवर फार मोठा आर्थिक भार पडणार आहे. याची जाणीव कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांनाही आहे. म्हणून सरसकट कर्जमाफी देण्यापेक्षा गावागावांत सर्व्हे करून खरोखरच जे शेतकरी कर्जात बुडलेले आहेत, त्यांचे कर्ज फिटणे शक्‍य नाही अशा शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी दिली जाईल.

ते म्हणाले, "गरज असेल त्याला कर्जमाफी व उर्वरित रक्कम शेतीसाठी पूरक योजना राबविण्यासाठी खर्ची पडल्यास त्याचा सर्व स्तरातील शेतकऱ्यांना पुरेपूर लाभ होईल. त्यामुळे याबाबत सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज आहे.

Web Title: loanwaiver benefits to needy farmers