'स्थानिक'मध्येही भाजप "राज्य'!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

भाजपचा "जय' होणार?
विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी अजूनही काही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून, काहीजण भाजपचा "जय' म्हणणार असल्याची चर्चा आहे. परिणामी, भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताकारणात उलथापालथ होणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे मात्र भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

शिवेंद्रसिंहराजेंमुळे समीकरणे बदलणार; भोसलेत्रयी ठरणार दमदार 
सातारा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केला. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाच आपल्या पक्षात खेचून घेतल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतही आपले "राज्य' आणले आहे. सातारा, जावळी पंचायत समितीच्या सत्तेवर राष्ट्रवादीचे चिन्ह असले, तरी सत्ता मात्र आता भाजपची राहणार आहे.

विधानसभेपूर्वी अजूनही जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याने स्थानिक स्वराज्यमधील वर्चस्वासाठी राष्ट्रवादीला झुंजावे लागेल. 

सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. आता मात्र खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात भाजपची त्सुनामी पसरली असून, त्या लाटेबरोबर शिवेंद्रसिंहराजे भोसले आज स्वार झाले. त्यामुळे भाजपची ताकद लक्षणीय वाढली आहे. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्यानंतर भाजपला जिल्ह्यात विधानसभा सदस्य मिळाला नव्हता. आता मात्र जिल्ह्यातून विधानसभेसाठी भाजपचे कमळ फुलण्याची आशा उंचावली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपालिकांच्या निवडणुकांत कऱ्हाड, वाई, महाबळेश्‍वर येथे अध्यक्षपद मिळवून भाजपने वर्चस्व गाजविले, तसेच काही नगरसेवकही विजयी झाले. जिल्हा परिषदेमध्ये सात सदस्य निवडून आले. शिवाय, पंचायत समित्यांमध्येही शिरकाव केला आहे. आता मात्र गत अडीच वर्षांत भाजपची ताकद विलक्षणीय वाढली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदन भोसले, अतुल भोसले या भोसलेत्रयींसह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, डॉ. दिलीप येळगावकर, विनायक पावस्कर, लक्ष्मी कऱ्हाडकर, अनिल देसाई, महेश शिंदे, दीपक पवार, मनोज घोरपडे आदींचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींपर्यंतचे वर्चस्व असून, त्याचा एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील बल वाढण्यास मदत होणार आहे. 

मेढा नगरपंचायत, सातारा व जावळी पंचायत समितींमध्ये शिवेंद्रसिंहराजेंची सत्ता आहे. सध्याचे नगरसेवक, समिती सदस्य हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर असले तरी शिवेंद्रसिंहराजेंच्या गटातील असल्याने तेथे आता वर्चस्व भाजपचे राहणार आहे. शिवाय, सातारा नगरपालिकेत भाजपच्या सहा नगरसेवकांनाही आता नगरविकास आघाडीच्या 12 नगरसेवकांची साथ लाभणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local Government Organization Election BJP Politics