लॉकडाउन, सर्व्हर डाऊन झाला, पिक विमा गेला

विष्णू मोहिते 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला लॉकडाऊन, सर्व्हर डाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यासाठी किमान आठवडाभराची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सांगली : यंदाच्या खरीपातील पिकांचा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत आज (31 जुलै) संपली. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. तरीही जिल्ह्यातून यंदा चांगला प्रतिसाद अपेक्षीत आहे. गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला लॉकडाऊन, सर्व्हर डाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यासाठी किमान आठवडाभराची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. 

विमा योजना ऐच्छिक असल्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसूचीत पिकांसाठी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधित बॅंकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्‍यक होते. योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र न देणाऱ्या कर्जदार सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाणार आहे. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मान्यता दिली. 

या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के अशा मर्यादित स्वरूपात ठेवला आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे त्या संबंधित आवश्‍यक कागदपत्रे भरून पीक संरक्षित करता येणार आहे. यासाठी शेतात पीक पेरल्याबद्दलचे स्वयंघोषित पत्र, सात बारा उतारा, आधारकार्ड व बॅंक पासबुकच्या झेरॉक्‍स प्रतीसह जवळच्या बॅंकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर हा विमा हप्त्याचा फॉर्म भरता येणार आहे. या योजनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागासाठी सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर रथ यात्रेचे आयोजन केले होते. 

भरावयाची रक्कम (हेक्‍टरी)  

पिके-----विमा रक्कम-----पीक विमा रक्कम 
भात-----45 हजार 500-----910 
भुईमूग-----35 हजार-----700 
सोयाबीन-----45 हजार-----900 
खरीप ज्वारी-----25 हजार-----500 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown, server down, crop insurance gone