Loksabha 2019 : खासदार शेट्टींचा काटा जयंतरावच काढणार - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

सरूड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात खासदार राजू शेट्टी अडकले आहे. जयंत पाटील फार हुशार आहेत. त्यांनी बरोबर शेट्टींना सापळ्यात ओढले आहे. तेच त्यांचा काटा काढतील, असा मार्मिक टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सरूड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात खासदार राजू शेट्टी अडकले आहे. जयंत पाटील फार हुशार आहेत. त्यांनी बरोबर शेट्टींना सापळ्यात ओढले आहे. तेच त्यांचा काटा काढतील, असा मार्मिक टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, ज्यांना गेली दहा वर्षे शिव्या दिल्या, तेच काँग्रेस-राष्ट्रवादीवाले शेट्टी यांना पाडणार आहेत. त्यांना फक्त आपण हातभार लावूया, असेही ते म्हणाले. सेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारने देश आणि महाराष्ट्राचा कायापालट केला आहे. जगात भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम मोदी यांनी केले आहे. राजू शेट्टी यांनी आंदोलने लांबवली. शेतकऱ्यांच्या कष्टाचे दूध ओतायचे, त्यांच्याच मालाची नासाडी करायची, हा कुठला आंदोलनाचा प्रकार? त्यांची आंदोलने नाटकी होती.’’

सदाभाऊ खोत म्हणाले, ‘‘शेट्टींना बहुजन समाजाची माणसं मोठी झालेली बघवत नाहीत. गेल्या साडेचार वर्षांत सरकारने शेतकऱ्यांवर काठी उगारली नाही, गोळीबार केला नाही; पण ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्या भ्रष्ट माणसांच्या बाजूला हे जाऊन उभा राहिले आहेत. पायाला पट्ट्या बांधायचे नाटक करायचे. आम्हीही त्यांच्याबरोबर चाललो होतो. आमच्या पायाला फोड आले नाहीत.’’

आमदार सत्यजित पाटील म्हणाले, ‘‘शेट्टींनी ज्यांच्याबरोबर अर्ज भरले, ते सर्व साखरसम्राट होते. शेतकरी मात्र गेटवर होता. त्यांनी हिंमत असेल तर शेतकऱ्यांना कारखानदारांकडून ठरलेली एफआरपी मिळवून द्यावी. म्हणूनच अशा विचित्र खासदाराला घरी बसवा.’’

धैर्यशील माने म्हणाले, ‘‘ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी गोरगरीब जनतेने निवडून दिले होते, त्यांचा विश्वासघात करून आता कारखानदारांच्या खांद्याला खांदा लावून ते उभे आहेत. असा खेळ करणाऱ्या या विश्वासघातकी नेत्याला त्याची औकात दाखवणारा हा तालुका आहे.’’

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, उपसभापती पांडुरंग पाटील यांची भाषणे झाली.
काय दिवस आले... ‘एक नोट, एक वोट’ हे सगळं खोटं आहे. डब्यातल्या पैशाने निवडणूक होत नाही, हे मला माहिती आहे. मीही त्यात होतो. ज्यांना तुरुंगात डांबणार म्हणत होता, त्यांना प्रचाराला बोलवताय. हे काय दिवस आले, असा टोला सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांना हाणला.

Web Title: Loksabha 2019 Chandrakant Patil comment