Loksabha 2019 : ब्राह्मण समाजाविरोधातील वक्तव्य राजू शेट्टींच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

एक नजर - 

  • खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाविरोधात केलेले वक्तव्य आले अंगलट.
  • हेर्ले (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीसमोर झालेल्या प्रचार सभेत शेट्टींची टीका 
  • शेट्टींच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई
  • ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर समाज यांच्यात तेढ निर्माण करीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा

हातकणंगले - हेर्ले (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीसमोर झालेल्या प्रचार सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाविरोधात केलेले वक्तव्य चांगलेच अंगलट आले असून, त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे (क्रमांक ३) प्रमुख मेघराज चंद्रकांत घोडके (रा. खोची) यांनी ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर समाज यांच्यात तेढ निर्माण करीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा आज हातकणंगले पोलिसांत दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी - हेर्ले येथे २ एप्रिलला शेट्टी यांची सायंकाळी प्रचार सभा होती. सभेत शेट्टी यांनी जवानांना शहिदांचा दर्जा मिळविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत कसे प्रयत्न केले, हे सांगत असताना सीमेवर आमची पोरं लढतात. मात्र देशपांडे, कुलकर्णी यांची पोरं सीमेवर लढत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ब्राह्मण समाजाने त्यांचा निषेध केला होता. याची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन आज हातकणंगले पोलिसांत त्यांच्याविरोधात कलम १८८ लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पोलिस निरीक्षक सीताराम डुबल तपास करीत आहेत.

Web Title: Loksabha 2019 Crime against MP Raju Shetti