Election Results : शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय

गणेश शिंदे
शुक्रवार, 24 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचा उत्साह वाढविणाऱ्या या निकालामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. एका बाजूला कारखानदारांचे राजू शेट्टी यांना बळ असतानाही आमदार पाटील यांची झुंज यशस्वी ठरली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचा उत्साह वाढविणाऱ्या या निकालामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. एका बाजूला कारखानदारांचे राजू शेट्टी यांना बळ असतानाही आमदार पाटील यांची झुंज यशस्वी ठरली आहे. शिरोळ तालुक्‍याच्या राजकारणाची ‘सेकंड इनिंग’ सुरू झाली असून तालुक्‍यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचे आव्हान शेट्टी यांच्यापुढे आहे. आईच्या पराभवाचा बदला घेण्यात धैर्यशील माने यशस्वी झाले आहेत.   

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रथम राजू शेट्टींच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. यानंतर आमदारकीचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच खासदारकीचे मैदान त्यांनी मारले. ऊस दराची चळवळ हीच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली. जयसिंगपूर येथे ऊस परिषदेच्या माध्यमातून ऊस दराचे आंदोलन सुरू होते. ऊस परिषदेत आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जहरी टीका केली गेली. गतवेळी भाजपबरोबर, यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हे शेट्टींचे तंत्र शेतकऱ्यांना मात्र पटले नाही. 

जे कारखानदार दरोडेखोर आहेत, असे शेट्टींनी ठासून सांगितले, तेच साखर कारखानदार शेट्टींच्या प्रचारात दिसल्याने ही बाब अनेकांना पटली नाही. त्यामुळे निगेटिव्ह मतांनी शेट्टींचा घात केला. याशिवाय मंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील झालेल्या अन्यायाचा पाढा थेट सभांमध्येच वाचला. ऊस दराच्या आंदोलनात शेट्टी यांची दुटप्पी भूमिका, साखर कारखानदारांशी साटेलोटे, दूध दराच्या आंदोलनातील वास्तवही मांडून शेट्टींविरोधात रान पेटविले. 

माने शिवसेनेचे उमेदवार असले तरी भाजपने त्यांच्या मागे मोठी ताकद उभी केली. आमदार उल्हास पाटील यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, गोकुळचे संचालक अनिलराव यादव, रामचंद्र डांगे आदींनी धैर्यशील माने यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी केली. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Result Hatkanangale constituency Shirol Taluka report