जात फॅक्‍टरनेच रोखली राजू शेट्टींची हॅट्‌ट्रिक

संजय खूळ
शुक्रवार, 24 मे 2019

शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात दुर्लक्ष या मुख्य कारणांबरोबरच जातीचा फॅक्‍टरनेच शेट्टी यांच्या विजयाची हॅट्‌्ट्रिक रोखली.  धैर्यशील माने या युवा नेतृत्वाला युवा पिढीने आणि मराठा समाजाने खासदार म्हणून पाठविताना त्यांच्यासमोर मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत.

इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात दुर्लक्ष या मुख्य कारणांबरोबरच जातीचा फॅक्‍टरनेच शेट्टी यांच्या विजयाची हॅट्‌्ट्रिक रोखली.  
धैर्यशील माने या युवा नेतृत्वाला युवा पिढीने आणि मराठा समाजाने खासदार म्हणून पाठविताना त्यांच्यासमोर मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत.

ऊसकरी शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे दैवत अशीच प्रतिमा खासदार शेट्टी यांनी केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांनी लढा देताना ऊस आणि दूध उत्पादक शेतकरी हा प्रश्‍न गांभीर्याने मांडला होता. कारखानदारीच्या विरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष होता. श्री. शेट्टी यांनी ऊसदर आंदोलनाला अनेकवेळा राज्यस्तरापर्यंत नेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. पहिल्या निवडणुकीत ते केवळ याच विषयावरून निवडून आले. दुसऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबरोबरच भाजपच्या लाटेचा फायदा त्यांना झाला होता. 

या वेळेच्या लोकसभा निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार असणारच नाही, असाच समज त्यांचा होता. हाच समज त्यांना धोकादायक ठरला. एकूणच परिस्थिती पाहता श्री. शेट्टी यांनी भाजपच्या बरोबर न राहता काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांची मते व काँग्रेस आघाडीची ताकद सहजपणे आपणास विजय मिळवून देईल, असाच समज त्यांचा पहिल्या टप्प्यात होता. 

श्री. शेट्टी यांचा विजयाचा वारू रोखण्यासाठी शिवसेना उमेदवाराची चाचपणी करीत होती. राष्ट्रवादीची असलेली जागा सोडून ती स्वाभिमानी संघटनेला दिल्यामुळे माने घराण्यात अस्वस्थता पसरली. अनेक वर्षे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सोबत असतानाही माने घराण्याने यावेळी पक्ष सोडला. राज्यातील शिवसेना आणि भाजपची वाढलेली ताकद, माने घराण्याची मतदारसंघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे व  मराठा समाजाचे असलेले मोठे अस्तित्व यांचा फायदा घेण्याचा निर्णय धैर्यशील आणि निवेदिता माने यांनी घेतला. त्यांनी थेट मातोश्रीचा रस्ता धरून लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले.

हा निर्णय त्यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच घेतल्याने त्यांना मतदारसंघात संपर्क ठेवण्यास पुरेसा वेळ मिळाला. शिवसेना आणि भाजपचे असलेले आमदार यांचे पुरेपूर बळ धैर्यशील यांना मिळाले. शेट्टी यांच्यावर टीका करताना धैर्यशील यांनी युवा पिढीला मोठे बळ दिले. त्याचबरोबर नवीन असलेले लाखाहून अधिक मतदारांच कल, मोदी फॅक्‍टर व श्री. माने यांची वक्तृत्वशैली याला जोड लाभली.

धैर्यशील यांच्या विजयासाठी मोठा वाटा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाने उचलला. मताधिक्‍क्‍यात तब्बल ६० ते ७० टक्के मताधिक्क इचलकरंजी मतदारसंघाने देऊन या वेळेच्या निवडणुकीचा कल याच मतदारसंघाने ठरविला. आमदार सुरेश हाळवणकर यांनी राबविलेली प्रभावी प्रचार यंत्रणाही श्री. माने यांच्या विजयाला उपयुक्त ठरली.

हातकणंगले मतदारसंघातील सर्वाधिक मतदार असलेल्या इचलकरंजीकडे श्री. शेट्टी यांनी केलेले दुर्लक्ष त्यांना महागात पडले. विषेशत: वारणा नदीतून पाणी आणण्याबाबत त्यांनी घेतलेली संदिग्ध भूमिका लोकांच्या मनात चिड आणणारी होती. त्यांनी वस्त्रोद्योग व्यवसायाकडेही लक्ष देणे गरजेचे होते. मात्र काही प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्याव्यतिरिक्त शहरात पाच वर्षात झालेल्या विविध आंदोलनात ते फारसे सक्रीय झाले नाहीत.

यंत्रमाग कामगारांच्या प्रश्‍नांकडेही त्यांनी दुर्लक्षच केले. त्यामुळे तब्बल ७० हजारांहून अधिक मताधिक्‍क्‍य देत इचलकरंजीने यावेळेचा खासदार ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जय शिवराय संघटनेचे शिवाजी माने या पूर्वाश्रमीच्या स्वाभिमानीच्या शिलेदारांनी या वेळी शेट्टी विरोधांत प्रचाराची राळ उडविली होती. त्याचाही फटका शेट्टींना बसल्याचे दिसते. 

माने यांच्या जमेच्या बाजू

  •  तरुण नेतृत्व, चांगले वक्‍तृत्व
  •  शिवसेनेच्या तिकिटामुळे तरुणांची साथ
  •  आई माजी खासदार यांचा अनुभव पाठीशी
  •  (कै.) बाळासाहेब माने यांचा संपन्न वारसा
  •  जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून प्रभावी काम
  •  कोरी पाटी, आरोपांना जागा नाही

श्री. शेट्टी यांना वाळवा व शिराळा या मतदारसंघातून मताधिक्‍क्‍य मिळाले असले तरी हातकणंगले, शाहूवाडी आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मताधिक्‍क्‍य वरचढच ठरले. शाहूवाडीचे आमदार सत्यजित पाटील- सरूडकर यांचा प्रभाव या निवडणुकीत स्पष्ट झाला आहे. श्री. माने यांनी मराठा कार्ड वापरून केलेली रणनीती त्यांच्या विजयास कारणीभूत ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Results Hatkanangale constituency special report