Election Results : माने जिंकले; पण शिवाजीराव नाईकांना इशारा

शिवाजीराव चौगुले
गुरुवार, 23 मे 2019

शिराळा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्राथमिक मतांचे आकडे आमदार शिवाजीराव नाईक गटाला सूचक इशारा देणारे ठरले आहेत. खासदार राजू शेट्टी यांना येथे सात हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. विधानसभेसाठी नाईक यांना ‘सावध’ करणारा हा आकडा आहे; मात्र देशभरात भाजपची त्सुनामी पाहता आमदार समर्थक सुखावले आहेत.  

शिराळा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्राथमिक मतांचे आकडे आमदार शिवाजीराव नाईक गटाला सूचक इशारा देणारे ठरले आहेत. खासदार राजू शेट्टी यांना येथे सात हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. विधानसभेसाठी नाईक यांना ‘सावध’ करणारा हा आकडा आहे; मात्र देशभरात भाजपची त्सुनामी पाहता आमदार समर्थक सुखावले आहेत.  

धैर्यशील मानेंच्या विजयाने शिराळा विधानसभा मतदारसंघात दुपारपासून शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मानेंच्या विजयाने कार्यकर्त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. शिवसैनिक अभिमानाने वावरू लागले आहेत. 

शिराळा विधानसभा मतदारसंघात ज्यांनी लोकसभेला हातात हात घालून प्रचार केला तेच एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. धैर्यशील मानेंच्या प्रचारात आमदार शिवाजीराव नाईक, सम्राट महाडिक, अभिजित पाटील, भगतसिंग नाईक; तर शेट्टींच्या प्रचारात मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख आघाडीवर होते. मात्र, विधानसभेला हे चित्र कसे असेल, याकडे लक्ष असणार आहे. हे सारेच विधानसभेला इच्छुक आहेत. आघाडी आणि युती झाली तरी थांबायचे कोणी, हा मोठा प्रश्न आहे. बंडाची शक्‍यता आहेच. 

शिराळा विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांचा आमदार शिवाजीराव नाईक यांनी, तर राजू शेट्टी यांचा माजी आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी प्रचार केला. धैर्यशील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन तरुणांना संधी द्या, अशी भावनिक साद घातली. शेट्टींसाठी मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी पायाला भिंगरी बांधली होती.

मानेंसाठी आमदार नाईक यांनी ताकद लावली. सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, अभिजित पाटील यांची साथ मिळाली. खरे तर लोकसभेची निवडणूक शेट्टी व माने यांच्या अस्तित्वाची असली तरी नाईक-देशमुख यांच्या प्रतिष्ठेची होती. शेट्टी यांना मताधिक्‍य मिळाल्याने मानेंचा विजय झाला तरी शिराळ्यासाठी सूचक इशारा ठरणार आहे. 

या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण शिराळा मतदारसंघ तिन्ही नेत्यांनी ढवळून काढला आहे. या प्रचार यंत्रणेच्या निमित्ताने प्रत्येकाने आपापल्या गटाच्या माध्यमातून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. लोकसभेचे उमेदवार बाहेरचे असल्याने अनेक ठिकाणी लोकांनी नेत्यांचा शब्द न पाळता आपणाला कोण योग्य वाटतो यावर मतदान केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Election Results Shirala constituency