Loksabha 2019 : हाफ चड्डीतला तो मीच - पडळकरांचे स्पष्टीकरण

Loksabha 2019 : हाफ चड्डीतला तो मीच - पडळकरांचे स्पष्टीकरण

सांगली - वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावरून फिरताहेत. याबाबत श्री. पडळकर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘‘होय, ते फोटो माझेच आहेत. मी भाजपमध्ये होतो, त्यावेळी भाजपशी संलग्न लोकांशी माझा संबंध होता. आता मी भाजप सोडली, सारे संबंध संपले. भिडे यांच्या कार्यक्रमांना शरद पवार, प्रतीक, विशाल पाटील सारेच येतात. मग माझेच फोटो माझी उमेदवारी कापली जावी, यासाठी व्हायरल झाले. विशाल-संजय पाटील यांनी माझी धास्ती घेतलीय. 

ओवेसींनी दखल घ्यावी म्हणून हे षङयंत्र

माझे हाफ चड्डीतले फोटो फिरवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, मी त्यांच्या अंगावर चड्डी ठेवणार नाही. आता विशाल यांनी कारखाना भाड्याने देताना मिळवलेले पैसे आणि खासदारांनी कृष्णा खोऱ्यातून ढापलेले पैसे तयार ठेवावेत. मी त्यांना रिकामे केल्याशिवाय सोडणार नाही.’’

वंचित बहुजन आघाडीला भाजप आणि आरएसएसचे गोपीचंद पडळकर उमेदवार म्हणून कसे चालतात. हे सशयास्पद आहे. एकीकडे संविधान मोडीत काढणाऱ्या या भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापन झाली आहे. आम्ही अशा भाजपला त्याची जागा दाखवून देऊ. 

- महेश खराडे, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

बदल्या करणं हाच खासदारांचा धंदा

संजय पाटील खासदार झाले; मात्र त्यांच्या वृत्तीत बदल झाला नाही. पाच वर्षे अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं आणि दहशत माजवणं यापलीकडे कामच केलं नाही. त्यांना मी समजावले होते; पण ते सुधारले नाहीत. बदल्या हाच त्यांचा धंदा राहिला, अशा शब्दांत  श्री. पडळकर यांनी हल्लाबोल केला.

‘स्वाभिमानी’कडून निश्‍चित झालेली उमेदवारी राज्यातील एका बड्या नेत्याने कापल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. 
खासदार पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, ‘‘त्यांची ताकद तासगावपलीकडे नाही. दीपक शिंदे वगळले तर त्यांच्यासोबत फिरायला माणूस नाही. भाजपमध्ये सुतकासारखी अवस्था आहे. ते लोकांना डॉन वाटायचे. आता काय अवस्था आहे. मीच त्यांना भाजपमध्ये आणले. लोकसभा लढायचा सल्ला दिला. आता ते विसरले असतील. ते स्वतःला मोठे समजतात; पण भाजपमध्ये असे दहा हजार लोक आहेत. त्यात यांचा लई लांबचा नंबर हाय. यांच्या या उद्योगामुळे नेतेच प्रचाराला येत नाहीत. शिवाजीराव नाईक जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री झाले असते. यांनीच त्यांना खोडा घातला. तीनवेळा आमदार राहिलेल्या खाडेंच्या मंत्रिपदाला मागास समाजातील असल्याने त्यांनी विरोध केला. जिल्ह्याला पाच वर्षे मंत्री नाही, हे त्यांचेच पाप. यांनी जिल्हा परिषद चिन्हावर लढवली नाही. महापालिकेत अडचणी आणल्या. जिल्हा पोलिसप्रमुख फुलारी यांची बदली करायला लावली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या बदलीत यांचाच हात. आताचे पोलिस अधीक्षक उत्तम काम करताहेत, तर ते तीनवेळा बदलीसाठी मंत्रालयात जाऊन बसले. बदल्यांचे कागद  फिरवण्यापलीकडे यांना येतेय काय? महामार्गाचे काम ही काय यांची कमाई नाही, ते होणारच होते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com