Loksabha 2019 : दादा-बापू-अण्णांच्या नावाने दरोडे टाकणाऱ्यांना घरी बसवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

सांगली - जिल्ह्यामध्ये वसंतदादा, राजारामबापू, संपतराव माने, जी.डी.बापू, नागनाथअण्णांचा काळ परत आणायचा असेल तर त्यांच्या नावाने दरोडे टाकणाऱ्यांना घरी बसवा, असे घणाघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी येथे घातला. 

सांगली - जिल्ह्यामध्ये वसंतदादा, राजारामबापू, संपतराव माने, जी.डी.बापू, नागनाथअण्णांचा काळ परत आणायचा असेल तर त्यांच्या नावाने दरोडे टाकणाऱ्यांना घरी बसवा, असे घणाघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी येथे घातला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हाभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्टेशन चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर स्टेशन चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. माजी आमदार प्रकाश शेंडगे, उत्तमराव जानकर, प्रा. सुकुमार कांबळे, नंदकुमार नांगरे, शकील पिरजादे, किरणराज कांबळे, सुहास पाटील, ब्रम्हदेव पडळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. पडळकर म्हणाले, "" मी निवडणूक लढणार नाही असे अनेकांना वाटत होते. मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. त्या सर्वांच्या प्रश्‍नांना ही गर्दी पाहून निश्‍चितच उत्तर मिळाले असेल. ही निवडणूक एकट्या गोपीचंदची नसून वंचितांची निवडणूक आहे. वंचिताना सन्मान देणारी ही निवडणूक आहे. ज्यांनी संधी दिली नाही, त्यांना चपराक देणारी निवडणूक आहे. मुस्लिम समाजाने माझ्या पाठीशी ठाम राहावे, त्यांना सन्मान, स्वाभिमान देऊ शकतो. दलित समाजाने पाठिंबा द्यावा, संविधानाला विरोध करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.'' 

ते पुढे म्हणाले, ""ही निवडणूक जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशी आहे. मी मोकळाच आहे. मला वापरून घ्या. मला सालगडी म्हणून ठेवा. पाच वर्षासाठी मला बिनपगारी म्हणून ठेवा. जर पाच वर्षे इमाने इतबारे काम केले नाहीतर 2024 मध्ये मला लाथ घाला. मी लापाट कार्यकर्ता नाही. खरेतर खासदार संजय पाटील यांनी अर्ज माघारी घ्यावा. विशाल पाटील यांनीही अर्ज मागे घेऊन अब्रू वाचवावी. 70 वर्षे तुम्हीच तिथे बसलाय आता मला बिनविरोध करा. छत्रपती शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्या वारसा सांगता. त्यांचे विचार कृतीत आणा.'' 

खासदार पाटील यांना लक्ष्य करताना श्री पडळकर म्हणाले,"" त्यांनी जिल्ह्यात तालुक्‍यात तालुक्‍यातील नेत्यांच्या खच्चीकरण केले. शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या अनुभवी माणसाचे मंत्रीपद असो कि तीन वेळा आमदार होणाऱ्या सुरेख खाडे यांचे मंत्रीपद यांनी कापले. चार आमदार आणि एक खासदार असलेल्या सांगली जिल्ह्याला मंत्रीपदच मिळू नये हे शंभर टक्के पाप यांचेच आहे. एकीकडे त्यांनी हा उद्योग मांडला तर डॉन असल्याच्या थाटात प्रत्येकावर दादागिरी करीत सुटला आहे. मात्र त्यांना भ्यायची गरज नाही. हा गोपीचंद त्यांची दादागिरी उखडून टाकेल.''

Web Title: Loksabha 2019 Gopichand Padalkar comment