Loksabha 2019 : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्येचे हणुमंतवडिये येथे मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

एक नजर

  • क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय - 94) यांनी केले आज हणुमंतवडिये (ता. खानापूर, सांगली) येथे मतदान
  • स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बजावला मतदानाचा हक्क 

 

सांगली -  क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय - 94) यांनी आज हणुमंतवडिये (ता. खानापूर, सांगली) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हौसाक्कांनी काही काळ समाजकारण व राजकारणातही त्यांनी सहभाग घेतला. पुरोगामी चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. 

हौसाताईंचे चिरंजीव आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड.सुभाष पाटील म्हणाले,"" आईने आजपर्यंतच्या ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंन्तच्याच सर्व निवडणुकांसाठी मतदान केले आहे. आजही तिने स्वेच्छेने मला सकाळी मतदानाला जायचेय असे सांगितले. मी गाडीने मतदान केंद्रापर्यंत नेले. तिथून तिने आधाराने केंद्रात जाऊन मतदान केले. गावात कुणाचा जोर आहे याबद्दल ती माझ्याकडून अपडेट घेत असते. आपल्या पक्षाच्या विचाराच्या उमेदवाराला मतदान व्हावे यासाठी ती आग्रही असते. तिची शेकापक्षाबद्दची निष्ठा तसुभरही कमी झालेली नाही.'' 

ते म्हणाले,"" माझे वडील भगवानाबाप्पा यांनी विधानसभेच्या 52, 57, 62, 67 च्या निवडणुका लढवल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही या निवडणुका लढवल्या. त्यामध्ये आई आघाडीची प्रचारक राहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील 57 च्या निवडणुकीत वडील आमदार झाले. त्यांनीही पक्षाची अखेरपर्यंत सेवा केली. आमचे कुटुंब आजही शेतकरी कामगार पक्षासोबत पुर्ण ताकदीने आहे. क्रांतीसिंह बीडमधून लोकसभेला विजयी झाले तेव्हा आई त्या भागात प्रचाराला गेली. त्यानंतरही राज्यभर पक्षाच्या सभांना जायची. जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीच्या सभा-बैठकांना तीची हजेरी नियमित असते. अलीकडे चार पाच वर्षे तिचा सार्वजनिक वावर कमी झाला आहे. मात्र ती आजही देशभरातील घडामोडी जाणून घेत असते. 2014 च्या आधीच्या सर्व निवडणुकांमध्ये तिचा प्रचारक म्हणून सहभाग राहिला आहे.'' 

Web Title: Loksabha 2019 Housabai Patil voting in Haumantvadiye in Sangli