Loksabha 2019 : चंद्रकांत पाटील महान, तज्ज्ञ मंत्री - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो,

कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लावला.

लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानात आयोजित विराट सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, २०१० पासून काँग्रेसच्या काळात सॅटेलाईट कसे पाडायचे, याचे संशोधन आपल्या ७२ संशोधकांनी केले. पहिला, दुसरा टप्पा २०१३ साली झाला. त्याची अंतिम चाचणी आता झाली. आपल्याच देशाचे निकामी झालेले सॅटेलाईट पाडण्याचे शास्त्र आपणच विकसित केले. आचारसंहिता असताना असा कोणताही अधिकार नव्हता.’’

ते म्हणाले, ‘मोदींनी घोषणा केली. इथे आपल्या शहरात तज्ज्ञ आहेत, ते महान आहेत. त्यांच्या विद्वतेबद्दल फारच आदर आहे, त्या चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की अमेरिका, रशिया, चीनऐवजी जर्मनीकडून मिळाल्याचे सांगितले. काहीही झाले तरी पाकिस्तानचे आम्ही काही तरी पाडले म्हणून मते मागण्याचा उद्योग किती टोकाला गेले आहे हे दिसून येते. आपण आपले सॅटेलाईट पाडले, हे म्हणतात पाकिस्तानचे पाडले. यांचा नेता सकाळी एक बोलतो, त्याकडेही श्री. पाटील यांचे लक्ष नाही.’’

प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेसने ६० वर्षांत काय केले म्हणून गेल्या निवडणुकीत मोदींनी सत्ता मागितली. त्याचवेळी त्यांनी वर्षाला दोन कोटी नोकऱ्या, शेतीमालाला दीडपट हमीभाव, १५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले; पण यापैकी काही झालेले नाही. चौकीदार चोर है, कुंभकर्णाला उठवावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणत होते. म्हणून अशा फसव्या सरकारला घरी घालवण्याची वेळ आली असून, खासदार महाडिक हे एक लाख मतांनी विजयी होतील.’’

 ‘२० वर्षे महाडिक कुटुंबीयांकडून विविध माध्यमातून लोकांची सेवा सुरू आहे. सेवेचे घेतलेले हे व्रत असेच कायम राहण्यासाठी तुम्ही फक्त मला उरलेले पाच दिवस द्या. संसदेत पाठवा. उर्वरित संपूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठी समर्पित करायला तयार आहे.’’

- धनंजय महाडिक, खासदार

जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘देशात थापेबाजी सुरू आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे लहान लहान कारखानदार उद्‌ध्वस्त झाले, शेतकरी अडचणीत आला. लोकांत ‘अंडरकरंट’ आहे. एक असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांना कधी एकदा २३ एप्रिल येते, असे झाले आहे. येत्या निवडणुकीत खासदार महाडिक व राजू शेट्टी यांच्या चिन्हासमोरील बटण मारून सरकारला घरला पाठवा.’’

‘‘आजची ही विराट सभा बघितल्यानंतर धनंजय महाडिक यांचा विजय होणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. गेल्यावेळी मोदी लाटेत त्यांच्या विजयासाठी आम्ही हाडाची काडं आणि रक्‍ताचे पाणी केले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अतिशय चांगले काम केल्याने त्यांना पुन्हा संसदेत पाठवूया.’’ 

- आमदार हसन मुश्रीफ

प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, ‘‘संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार उलथवून टाकून आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी सर्वांनी राहण्याची गरज आहे.’’  

माजी आमदार संपतराव पवार-पाटील, प्रा. विश्‍वास देशमुख, सागर कोंडेकर, सौ. संगीता खाडे, बळवंत माने आदींची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले. आभार काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सातपुते यांनी मानले.

व्यासपीठावर आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री जयवंतराव आवळे, भरमू पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समन्वयक भीमराव पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे, संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, रणजित पाटील, सौ. अरुंधती महाडिक, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, दगडू भास्कर, जहीदा मुजावर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 jayant Patil comment